आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजणारे असे आहे कोल्हापुरातील सुंदर घर

सुधाकर काशीद
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

खेळता वारा, अंगणातील झाडे आणि घरात भरपूर प्रकाश ज्या घरात असतो, त्या घराचे अंतरंग खूप काही वेगळे असते. असा शाश्‍वत संदेश देणारे कोल्हापुरात एक घर आहे.या घराची ‘तैवान आर्किटेक्‍चर’ या भारतीय तंत्रज्ञानातील बांधकामावर प्रसिद्ध झालेल्या खास अंकात नोंद घेतली गेली आहे. 

कोल्हापूर - घराच्या दरवाजाची दिशा या बाजूला, बाथरूम त्या बाजूला, बेडरूम इथेच, किचन तिथेच, रंग असला आणि तसलाच. असल्या तंत्रज्ञान घराला गुरफटून टाकण्याच्या एका शास्त्राचा अतिरेक होऊ लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर फक्त खेळता वारा, अंगणातील झाडे आणि घरात भरपूर प्रकाश ज्या घरात असतो, त्या घराचे अंतरंग खूप काही वेगळे असते. असा शाश्‍वत संदेश देणारे कोल्हापुरात एक घर आहे. आणि या घराचे अंतरंग राष्ट्रीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोचले आहे.

दारात हिरवी झाडी, भरपूर वारा आणि प्रकाश येईल, असे दरवाजे, खिडक्‍यांची रचना आणि कमीत कमी खर्चात घराची उभारणी. अशा या घराची ‘तैवान आर्किटेक्‍चर’ या भारतीय तंत्रज्ञानातील बांधकामावर प्रसिद्ध झालेल्या खास अंकात नोंद घेतली गेली आहे. 

अवाढव्य खर्च न करता अंतरंग सजावट

हे घर आर्किटेक्‍चर मिलिंद रणदिवे यांचे आहे. सुर्वेनगर, कळंबा मार्गावर बुद्धिहाळकर नगर येथे हे घर आहे. घराचे नाव पश्‍चिमा आहे. या घराच्या बांधणीची कथा खूप वेगळी आहे. अलिकडे घर बांधायचे राहू दे बाजूलाच, पण फ्लॉट घेतानाही ते असा, तसा, त्रिकोणी, चौकोनी, त्याची दिशा अशा सर्व अंगाने छाननी करण्याची पद्धत रूढ झाली आहे. अमुक एका ‘तंत्रज्ञाने’ यस म्हटले तरच फ्लॉट खरेदी केली जात आहे. बुद्धिहाळकर नगरात असाच एक प्लॉट पडून होता. तो फ्लॉट ‘तज्ज्ञांच्या’ मते अशुभ होता. त्यामुळे तो विकला जात नव्हता. मिलींद रणदिवेना मात्र त्या फ्लॉटमधील वारा, प्रकाश आणि झाडे लावण्यासाठी विस्तीर्ण मोकळ्या जागेने भुरळ घातली. त्यांनी तो फ्लॉट घेतला. व त्या प्लॉटवर कॉलम न उभारता चिऱ्याच्या भिंतीवर लोड बेअरिंगचे बांधकाम केले. अनेकांना सुरवातीला वाटले ते एखादे वर्कशॉप तेथे सुर करणार आहेत; पण तेथे त्यांनी घराची सुंदर रचना केली. अवाढव्य खर्च न करता अंतरंग सजावट केली. 

घराच्या दारात अगोदर कमी झाडे होती. रणदिवेनी आणखी झाडे लावली. आणि घराच्या अंगणात हिरवाईच बहरली. झाडे लावताना फळाची लावल्याने त्यावर पक्षी बसू लागले. या घराचा आपल्याला उपद्रव नाही हे लक्षात आल्यावर झाडावरती घरटी बांधू लागले. आता मिलींद रणदिवे तर या प्लॉटवर राहतातच; पण त्यांच्या बरोबरी पंधरा ते वीस पक्ष्यांची घरटी त्यांच्या अंगणातील झाडावर आनंदाने किलबिलाट करीत असतात. मिलिंद रणदिवे यांच्या ‘पश्‍चिमा’ घरात भरपूर प्रकाश आहे. खेळता वारा आहे. हिरवेगार अंगण आहे. पक्ष्याचा किलबिलाट आहे. आणि हे संदर घर पाहायला नवीन शिकणाऱ्या आर्किटेक्‍ट मंडळीची भेट तर नित्याची झाली आहे. सुंदर घर कशाला म्हणायचे याचे ‘पश्‍चिमा’ हे उत्तरच आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beautiful House With International Acclaim In Kolhapur