मधमाश्‍यांच्या हल्ल्यात जखमी कोल्हापुरातील दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - बालिंगा पाडळी (ता. करवीर) येथे मासे पकडण्यास गेलेल्या दोन वृद्धांवर मधमाश्‍यांनी हल्ला केला. उपचार सुरू असताना त्या दोघांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. ईस्माईल अब्दुल मुल्ला (वय 65, रा. सरनाईक वसाहत जवाहरनगर) आणि गौस बाबालाल बागवान (वय 65, रा. यादवनगर) अशी त्यांची नावे आहेत. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.

कोल्हापूर - बालिंगा पाडळी (ता. करवीर) येथे मासे पकडण्यास गेलेल्या दोन वृद्धांवर मधमाश्‍यांनी हल्ला केला. उपचार सुरू असताना त्या दोघांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. ईस्माईल अब्दुल मुल्ला (वय 65, रा. सरनाईक वसाहत जवाहरनगर) आणि गौस बाबालाल बागवान (वय 65, रा. यादवनगर) अशी त्यांची नावे आहेत. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.

याबाबत नातेवाईक व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुल्ला जळाऊ लाकडाचा तर बागवान फळ विक्रीचा व्यवसाय करत होते. दोघांना मासेमारीची आवड होती. मंगळवारी (ता. 8) दोघे दुपारी बालिंग्यापुढील पाडळी गावाच्या नदीकाठी मासेमारीसाठी गेले होते. मासेमारी करत असताना जवळच्या झाडावरील एका माकडाने मधमाश्‍यांच्या पोळ्याला धक्का दिला. त्यामुळे त्या उठल्या आणि त्यांनी मुल्ला आणि बागवान यांच्यावर हल्ला चढविला. सुमारे तीन तास या मधमाश्‍यांनी दोघांचा चावा घेतला. त्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. सायंकाळी एका शेतकऱ्याला हा प्रकार लक्षात आला. त्यांनी याची माहिती मुल्ला यांच्या घरी कळवली.

त्यांनी बागवान यांच्या घरातल्यांना हा प्रकार सांगितला. दोन्ही कुटुंबातील नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच दिवशी मध्यरात्री बागवान यांचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला, तर आज सकाळी ईस्माईल मुल्ला यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर करवीर पोलिसांनी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. त्यांच्या मागे तीन मुली, एक मुलगा, पत्नी असा परिवार आहे. बागवान यांच्या मागे तीन मुलगे, पत्नी, सुना नातवंडे असा परिवार आहे.

आग्यामोहोळ मधमाशी
आग्या मोहोळ माशीचे एपिस डॉरसेटा असे शास्त्रीय नामकरण असून, मोठ्या झाडाच्या फांद्या, दगडी पूल, घरे, अपार्टमेंटस्‌, उंच बिल्डिंगच्या छताखाली त्या पोळे तयार करतात. हे पोळे 150 सेंटीमीटर लांब तर 70 सेंटीमीटर उंच असते. घनदाट अरण्यात त्यांची अधिक पोळी असतात. एका पोळ्यांमध्ये लाखावर मधमाश्‍या असतात. मध तयार करण्यासाठी लागणारे घटक मिळवण्यासाठी या माश्‍या सतत स्थलांतर करतात; पण एका ठिकाणी त्या 34 महिन्यांपर्यंत थांबतात. शक्‍यतो जेथे फुले मुबलक प्रमाणात असतात, तेथे पोळे बांधले जाते. दक्षिण आशियाई देशांमध्ये या माशीचे प्रमाण जास्त असून, एका पोळ्यात एक राणीमाशी, खूप नरमाशा, हजारो कामकरी माशा असतात. कामकरी माश्‍यांची लांबी तीन सेंटीमीटरपर्यंत असते. मधमाशीने दंश केल्यानंतर ती त्वचेमध्ये सूक्ष्म काटा (स्टिंगर) सोडते. हा काटा सुईच्या अग्रासारखा असून, त्याची रचना ही करवती सारखी असते. तो पोकळ अन्‌ धारदार असतो. दंशानंतर हा काटा त्वचेत एखाद्या स्क्रुप्रमाणे फिरत जातो. यानंतर शरीरात अपामिन, मेलिटीन, फॉस्फोलिपेज, हायल्युरनिडेज, एपिटॉक्‍झिन, ऑर्गनिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड हे घटक प्रवेश करतात. त्यामुळे तीव्र त्वचादाह, रक्त येणे, कंड सुटणे, सूज, वेदना होतात. मधमाशी चावण्याचे प्रमाण प्रचंड असेल तर मृत्यूही होतो; मात्र मधमाशीचे हे विष औषधेनिर्मितीमध्येही वापरले जाते. वेदनाशमक, कर्करोगात निर्माण होणाऱ्या गाठी, त्वचारोग, संधीवात आदींवरील औषधात या विषाचा वापर होतो.

मधमाशी हल्ला का करते?
- वातावरणात होणारे झपाट्याने बदल
- तीव उष्णता, हवेतील आर्द्रता
- पावसाळी वातावरण
- मध, मेण मिळविण्यासाठी पोटावर पिवळे पट्टे असणाऱ्या कुंभारमाश्‍यांच्या थव्याचा हल्ला होत असेल तर
- एखाद्या परिसरात फुलांचे प्रमाण कमी होणे
- मधाची चोरी होणे
- आग, धुराचे प्रमाण वाढल्यानंतर
- माकडे, अन्य प्राण्यांकडून उपद्रव

Web Title: The bees' attack killing two injured in Kolhapur