पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरास केलेली रंगरंगोटी काढण्याला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

- विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराचे आयुष्य वाढविण्यासाठी मंदिर समितीने पुढाकार घेतला

- सर्व भिंतींना मूळ रूप देण्याचे काम सुरू आहे

- रंगरंगोटीमुळे मंदिराचे आयुष्य कमी होत असल्याची बाब पुरातत्त्व विभागाने समितीच्या निदर्शनास आणून दिली होती

-  मंदिराच्या मूळ रूपाविषयीही काही सूचना केल्या होत्या

पंढरपूर : " हे नोव्हे आजी कालीचे, युगे अठ्ठावीसाचे'' असं पंढरपुरातील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराच्या बाबतीत आजही म्हटलं जातं. अनादी कालापासून मराठी माणसांचे कुलदैवत आणि वारकऱ्यांचा श्‍वास असलेल्या येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराचे आयुष्य वाढविण्यासाठी मंदिर समितीने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून मंदिराच्या सर्व भिंतींना मूळ रूप देण्याचे काम सुरू आहे. सर्व मंदिराच्या भिंती आणि छतांना करण्यात आलेली रंगरंगोटी काढण्यात आली आहे. त्यामुळे आता मंदिराच्या मूळ रूपाला झळाळी आली आहे.

कोट्यवधी भाविकांचे आणि वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या विठुमाऊलीच्या दर्शनासाठी देश-विदेशातून भक्तांची मांदियाळी येते. येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर हे वास्तुकलेचा एक उत्कृष्ट आविष्कार मानला जातो. अनादीकालीन असलेलं हे मंदिर आजही तितक्‍याच रुबाबत आणि दिमाखात उभे आहे. शतकानुशतके असेच हे मंदिर आणि मंदिराचे रूप जिवंत राहावे यासाठी मंदिराचे आयुष्य वाढविण्यासाठी समितीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यापैकी मंदिराला मूळ रूप देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. 

या निर्णयानुसार समितीच्या वतीने मंदिराच्या भिंतीची स्वच्छता आणि डागडुजी करण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी मंदिराच्या सर्व भिंती आणि छतांना विविध रंग देण्यात आले आहेत. रासायनिक मिश्रित असलेल्या या रंगांमुळे मंदिराचे मूळ रूप झोकाळून गेले होते. शिवाय अशा रंगरंगोटीमुळे मंदिराचे आयुष्य कमी होत असल्याची गंभीर बाब पुरातत्त्व विभागाने समितीच्या निदर्शनास आणून दिली होती. या विभागाने मंदिराच्या सुरक्षिततेविषयी आणि मंदिराच्या मूळ रूपाविषयी काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार मंदिर समितीने मंदिराच्या सर्व भिंती आणि छतांना देण्यात आलेले विविध रंग काढण्याचे काम हाती घेतले आहे. 

संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा उत्साहात

मंदिराच्या दगडी भिंतींचा रंग काढण्यात आल्याने मंदिराला एक प्रकारची झळाळी आली आहे. आतापर्यंत 70 ते 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामदेखील दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. मंदिरातील अनेक जुन्या भिंतींना तडे गेले आहेत. काही ठिकाणचे दगडही निसटण्याच्या स्थितीत आहेत. अशा ठिकाणीही पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार डागडुजी केली जाणार आहे. मंदिराच्या भिंतीच्या स्वच्छतेचे काम अंतिम टप्प्यात आल्याने मंदिराचे बाह्यांग खुलून दिसू लागले आहे. 

या मंदिरात झाला दीपोत्सव....

मंदिराचे मूळ रूप आता भाविकांना पाहायला मिळेल
विठ्ठल मंदिर हे अनादी कालापूर्वी बांधण्यात आलेले आहे. आजही मंदिर भक्कम आहे. मंदिराचे आयुष्य वाढवण्यासाठी आणि मंदिराला मूळ रूप प्राप्त करून देण्यासाठी मंदिराच्या सर्व भिंतींना देण्याते आलेले रंग काढण्यात आले आहेत. त्यामुळे मंदिराचे मूळ रूप आता भाविकांना पाहाता येणार आहे. मंदिराची डागडुजी देखील केली जाणार आहे. 
- गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष, विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समिती, पंढरपूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Begin to remove the paint on the Vitthal Temple in Pandharpur