नळाच्या तोटीपासून केली सुरवात, आता पोचलेत कपाटापर्यंत!

परशुराम कोकणे : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

लहान वयातच गुन्हेगारीकडे वळालेल्या या मुलांना आई-वडील नाहीत. ज्यांना आहेत, त्यांचे मुलांकडे लक्ष नाही. चोरीच्या घटनांमध्ये ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार बालसुधारगृहात दाखल केले जाते. बालसुधारगृहातून काही दिवसांतच बाहेर येतात आणि पुन्हा आपल्या पूर्वीच्या मार्गाला लागतात. अशा अल्पवयीन चोरट्यांचे प्रमाण दिवसें-दिवस वाढत आहे. त्यांच्यात सुधारणा घडविण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे.
- दत्तात्रेय कोळेकर,
सहायक पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा

अल्पवयीन चोरट्यांचे वाढतेय प्रमाण; पोलिस झाले हैराण

सोलापूर : ऐश करण्यासाठी नळाच्या तोट्या चोरून भंगारात विकणाऱ्या अल्पवयीन चोरट्यांच्या टोळीने आता मोठा हात मारायला सुरवात केली आहे. पालकांचे दुर्लक्ष तसेच संस्कार आणि शिक्षणाअभावी झोपडपट्टी परिसरात राहणारी मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. कायद्याने अल्पवयीन गुन्हेगारांवर कठोर कारवाई करता येत नसल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत.

सोलापुरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या चोरी, घरफोडीच्या घटनांमध्ये 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या काही चोरट्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या या मुलांचे पालक मजुरी करतात. शिक्षणाचा गंध नसल्याने मुलांवर संस्काराचाही अभाव आहे. यापैकी काही मुलांचे आई-वडीलदेखील नाहीत, ते आजी किंवा मामाकडे राहतात. दिवसभर घराबाहेर भटकणाऱ्या या मुलांची गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची संगत आहे.

गुन्हे शाखेने गेल्या आठवड्यात ताब्यात घेतलेल्या एका अल्पवयीन चोरट्याच्या चौकशीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अल्पवयीन चोरट्याने पैसे मिळविण्यासाठी गल्ली-बोळात, कॉलनी, अपार्टमेंटमधील नळाच्या तोट्या चोरण्यास सुरवात केली. तोट्या भंगार दुकानात विकून मिळणाऱ्या पैशातून चिकन, मटण खाऊन ऐश करण्याचा जणू नादच त्याला लागला. भंगार दुकानात चोरीच्या वस्तू विकायला गेल्यावर तिथे येणाऱ्या इतर चोरट्यांशी त्याची ओळख झाली. त्यानंतर त्याने साथीदारांच्या मदतीने नळांच्या तोट्यांसोबतच घराच्या परिसरातील साहित्यही चोरण्यास सुरवात केली. या टोळीने हळूहळू करत बंद घरांचे कुलूप तोडून किमती साहित्य चोरण्यास सुरवात केली. आता ही टोळी चोरी, घरफोडी करण्यात पटाईत झाली असून त्यांनी शहरात विविध भागांत चोऱ्या केल्याचे तपासात समोर आले आहे. टोळीचा म्होरक्‍या असलेल्या अल्पवयीन चोरट्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. मात्र चारच दिवसांत नातेवाइकांनी ओळख देऊन त्याला सोडविले आहे.

दिवसा सर्वेक्षण, रात्री चोरी
अल्पवयीन चोरटे दिवसा शहराच्या विविध भागांत फिरून कोणती घरे बंद आहेत, आपल्या हाती काही लागेल का, याचा अंदाज घेतात. बंद घरांवर लक्ष ठेवून मध्यरात्रीच्या सुमारास साथीदारांच्या मदतीने घरातील किमती साहित्यासोबतच कपाट उचकटून दागिने आणि पैसे पळविण्याच्या घटना घडत आहेत.

 

Web Title: Since the beginning of the tap tap, now they came wordrob!