सुळेरान बंधाऱ्याजवळून बेळगुंदीचा शेतकरी वाहून गेला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

तालुक्‍यातील सुळेरान बंधाऱ्याजवळच्या ओढ्याच्या मोरीवरून बेळगुंदी (ता. गडहिंग्लज) येथील शेतकरी वाहून गेल्याची घटना बुधवारी (ता. 11) दुपारी घडली. शंकर लक्ष्मण कुराडे (वय 75) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. कुराडे मुळचे बेळगुंदीचे असले तरी त्यांची शेती आजरा तालुक्‍यातील आंबाडे येथे आहे. 

आजरा : तालुक्‍यातील सुळेरान बंधाऱ्याजवळच्या ओढ्याच्या मोरीवरून बेळगुंदी (ता. गडहिंग्लज) येथील शेतकरी वाहून गेल्याची घटना बुधवारी (ता. 11) दुपारी घडली. शंकर लक्ष्मण कुराडे (वय 75) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. कुराडे मुळचे बेळगुंदीचे असले तरी त्यांची शेती आजरा तालुक्‍यातील आंबाडे येथे आहे. 

बुधवारी (ता. 11) बेळगुंदीची यात्रा होती. त्यासाठी दुपारी ते डोकीवरून फणस घेवून गावाकडे जाण्यास निघाले. हिरण्यकेशी नदीवर सुळेरान बंधारा आहे. त्यावर पाणी नाही. यामुळे बंधारा ओलांडून ते पुढे आले. बंधाऱ्याच्या लगतच हिरण्यकेशीचा दुसरा प्रवाह वाहतो. त्यावर छोटी मोरी होती. आंबोली परिसरातील दोन दिवसाच्या प्रचंड पावसाने पाण्याचा प्रवाह वाढून ही मोरीच वाहून गेली होती. परंतु, त्याचा अंदाज कुराडे यांना नव्हता. मोरी असल्याच्या समजातूनच ते पाण्यातून जाण्याचे धाडस केले. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने ते त्यातून वाहून गेले. 

रात्री उशिर झाला तरी कुराडे घरी न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी आंबाडे गावी मोबाईलवरून विचारपूस केली. गावाकडे जाणार म्हणून दुपारीच येथून कुराडे निघून गेल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. यामुळे आज पहाटेच बेळगुंदीतील त्यांचे नातेवाईक आंबाडे येथे आले. दरम्यान, रस्त्याकडेला दोन फणस व झाडाला पावसापासून बचावासाठी असलेली प्लास्टिकची पिशवी अडकविलेली दिसली. यावरून कुराडे वाहून गेल्याचा संशय आला. 

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संदीप भागवत, नायब तहसीलदार डी. डी. कोळी, विस्तार अधिकारी पी. जी. चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. दोन्ही बाजूला असलेल्या बांबूला दोरी बांधून जाण्याचा प्रयत्न झाला. परंतु, पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने शोध मोहिमेत अडथळे येत आहेत. घटनास्थळापासून दहा ते बारा किलोमीटरवर आंबोली आहे. त्या परिसरात मुसळधार पाऊस असल्याने पाण्याचा प्रवाह कमी झालेला नाही. मोरी वाहून गेल्याने पाण्याची खोली वाढली आहे. यामुळे शोध मोहिम करण्यात प्रचंड अडथळे येत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belagundi farmer was near the Suleran dam