डॉ. कलबुर्गींचे खुनी पडद्याआडच ! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

""हल्लेखोर लवकरच गजाआड होतील. महत्त्वाचे धागेदोरे हाती आले आहेत. कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रातील तपास यंत्रणेशी संवाद साधून माहितीची देवाण-घेवाण केली आहे. त्यामुळे जलदगतीने काम करून या प्रकरणाची लवकरात लवकर उकल करावी.'' 
- सिद्धरामय्या, मुख्यमंत्री 

बेळगाव - ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांनी समाजाला विवेकवादाचा मार्ग दाखविला. त्यांच्या हत्येनंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या हत्येमागे जातीयवादी शक्‍तींचा हात असल्याचे सांगण्यात आले. "अंनिस'चे नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्यांशी साधर्म्य असल्याचे आढळून आले. दोन वर्षे झाली तर मारेकऱ्याचा तपास लागलेला नाही. तपास अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येते, पण हाती काहीच गवसत नसल्याचे चित्र आहे. 

अंधश्रद्घा निर्मूलन समिती अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्यानंतर कर्नाटकात पहिल्यांदाच विवेकवादी विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची धारवाडमध्ये 30 ऑगस्ट 2015 ला हत्या झाली. विद्यार्थी असल्याचे भासवून दोघांनी डॉ. कलबुर्गी यांची दरवाजातच गोळ्या घालून हत्या केली होती. हा प्रकार पूर्वनियोजित होता. सरकारने गुन्हे अन्वेषण खात्याकडे तपास सोपविला. विशेष पथके स्थापन केली. दोन वर्षांच्या काळात डॉ. कलबुर्गी यांचे आणि डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांचे मारेकरी एकच असल्याचा, तिन्ही खुनांत एकच पिस्तूल वापरल्याचा दावा करण्यात आला. आजतागायत या तिन्ही घटनांतील मारेकरी सापडलेले नाहीत. 

पाठपुराव्याचा अभाव  
महाराष्ट्रात डॉ. दाभोलकर, पानसरे यांच्या हत्यांचा तपास लावण्यासाठी सरकारवर लोकांचा, परिवर्तनवादी चळवळीचा दबाव दिसतो. पण, कर्नाटकात डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येच्या चौकशीबाबत तुलनेत पाठपुरावा होत नाही. दरम्यानच्या काळात विवेकवादी साहित्यिक, परिवर्तनवादी संघटनांनी बंगळुरात आंदोलन केले होते. पण त्यानंतर तो जोर राहिला नाही. शिवाय विरोधी पक्षांकडूनही हा विषय जोमाने लावून धरण्यात येत नाही. त्यामुळे डॉ. कलबुर्गी यांचा तपास रखडल्याचा आरोपही होतोय. 

अंधश्रद्धाविरोधी कायदा नाहीच 
डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकातही अंधश्रद्घाविरोधी कायदा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्याचा मसुदा तयार करण्यात आला. पण त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आणि तो विधिमंडळात मंजुरीविनाच लोंबकळत राहिला आहे. 

Web Title: belgaon news Dr Kalburgi murder case