गरीब रुग्णांनाही आयसीयू सुविधा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या उपकरणांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे उपकरणे खरेदी करण्यात येत आहेत. ज्यावेळी इतर निधी उपलब्ध होईल, त्यावेळी रुग्णालयाचे काम सुरू होईल.
- डॉ. एस. टी. कळसद, बिम्स संचालक

बेळगाव - वाढती लोकसंख्या, आरोग्याच्या समस्या आणि जिल्हा रुग्णालयात डॉक्‍टर, उपचाराची कमतरता यामुळे बहुतांश लोक जिल्हा रुग्णालयाकडे पाठ फिरवितात. पण लवकरच ‘बिम्स’च्या आवारात सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी होणार असून गरीब रुग्णांनाही आयसीयू सुविधेचा लाभ मिळेल. सध्या सिव्हिलमध्ये ही सुविधा नाही.

सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी राज्य सरकारने १९५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी ५२ कोटी रुपये उपकरणांच्या खरेदीसाठी उपलब्ध झाले असल्याने लवकरच या कामाला गती येणार आहे. बेळगाव तीन राज्यांच्या सीमेवर असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. कर्नाटकाबरोबरच महाराष्ट्रातील रुग्णही येत असतात. त्यामुळे सर्वांना सुरळीत उपचार मिळणे कठीण असते. त्यातच डॉक्‍टर आणि इतर कर्मचाऱ्यांची कमरतता असल्यामुळे आरोग्य विभागावर ताण पडत आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून बेळगावात सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची मागणी होत होती. त्यानुसार राज्य सरकारने गेल्या अर्थसंकल्पात बेळगावला सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची तरतूद केली आहे. त्यासाठी १९५ कोटी रुपयेही मंजूर केले आहेत.

सध्या जिल्हा रुग्णालयात ७४० खाटांची सोय आहे. रोज १,५०० ते २,००० रुग्णांवर ओपीडीत उपचार होतो. रोज २०० ते २५० रुग्ण दाखल होतात. मात्र आयसीयूची व्यवस्था नाही. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयांवरच अवलंबून राहावे लागते. 

सरकारने मंजूर केलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात २०० खाटा असणार असून आयसीयूत ५० खाटांची सोय असणार आहे. सहा मजली इमारत बांधकाम होणार आहे. त्यासाठी १९५ कोटी रुपये मंजूर आहे. बिम्सतर्फे (बेळगाव वैद्यकीय संस्था) हे काम होणार आहे. त्यामध्ये शस्त्रचिकित्सा, अर्भक आणि मुले, हृदयरोग, किडनी संबंधित, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर आदी १२ विभाग असणार आहेत. या विभागांत आधुनिक उपकरणांचा वापर होणार असून त्यासाठी ५२ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या रुग्णालयात दहा ते १२ तज्ज्ञ डॉक्‍टर, २०० नर्सची आवश्‍यकता असणार आहे. जिल्हा रुग्णालयाच्या बाजूलाच सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार असल्यामुळे त्याचा सामान्य लोकांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे याचा खासगी रुग्णालयांचा दणका बसणार आहे.

Web Title: belgaon news hospital ICU