‘एनसीसी’प्रमाणेच आता आग नियंत्रणासाठी ‘एफसीसी’

विनायक जाधव 
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

बेळगाव - विद्यार्थ्यांमधील देशप्रेम वाढीस लावण्यासाठी, त्यांच्यामध्ये लष्करी शिस्त, स्वच्छतेची जाणीव निर्माण करण्यासाठी राष्ट्र पातळीवरील माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयात एनसीसी व एनएसएस विभाग सुरू करण्यात आले. आता राज्य पातळीवर एफसीसी (फायर कॅडेट कोअर) सुरू करण्यात आले आहे. महाविद्यालयीन पातळीवर ‘फायर फायटर’ तयार करण्यासाठी अग्निशमन दलाची ही योजना आहे. 

बेळगाव - विद्यार्थ्यांमधील देशप्रेम वाढीस लावण्यासाठी, त्यांच्यामध्ये लष्करी शिस्त, स्वच्छतेची जाणीव निर्माण करण्यासाठी राष्ट्र पातळीवरील माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयात एनसीसी व एनएसएस विभाग सुरू करण्यात आले. आता राज्य पातळीवर एफसीसी (फायर कॅडेट कोअर) सुरू करण्यात आले आहे. महाविद्यालयीन पातळीवर ‘फायर फायटर’ तयार करण्यासाठी अग्निशमन दलाची ही योजना आहे. 

अग्निशमन दलाचे केवळ आग विझविणे इतकेच काम नसून महापूर, दुष्काळ, इमारत पडण्यासारखी एखादी मोठी दुर्घटना घडल्यास तातडीची सेवा उपलब्ध करून देणेही आहे. ‘सेफ’ (स्टुडंट असोसिएशन ऑफ फायर एज्युकेशन) अंतर्गत प्रत्येक अग्निशमन ठाणा व्याप्तीमध्ये पाच महाविद्यालये निवडून विद्यार्थ्यांचे गट तयार केले जातील. त्याला एफसीसी म्हणून ओळखले जाईल. बेळगाव जिल्ह्यात पहिली एफसीसी तुकडी सुरू करण्याचा मान शिंदोळीजवळच्या मोतीचंद लेंगडे भरतेश पॉलिटेक्‍निकला मिळाला आहे. ‘लेंगडे’ विद्यार्थ्यांना अग्निशमन दलाकडून तातडीच्या सेवेचे धडे दिले जात आहेत. 

अग्निशमनची कवायत, अग्निशमन ठाण्यात केली जाणारी कामे, आग लागल्यानंतर ती कशी विझवावी, महापूर किंवा  आणीबाणीच्या काळात कोणत्या उपाययोजना राबविल्या जाव्यात, तातडीच्या सेवाकाळात अग्निशमन जवानांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत कसे काम करावे हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. अिग्नशमन बंबाद्वारे आग विझविण्याच्या प्रशिक्षणाचाही समावेश आहे. प्रशिक्षणाचा कालावधी दहा दिवसांचा असून छात्र अग्निशमन केंद्राशी जोडले जातील. आपत्कालात ते दलाच्या जवानांना मदत करतील.  

फायर वॉर्डन 
अग्निशमन दलाने महाविद्यालयीन पातळीवर एफसीसी सुरू करतानाच स्थानिक पातळीवर प्रत्येक अग्निशमन ठाणा व्याप्तीमध्ये फायर वाॅर्डन ही संकल्पना राबविली आहे. संघ, युवक मंडळाच्या माध्यमातून २० युवकांचा गट बनवून त्यांना आठवड्यातील एक दिवस प्रशिक्षण दिले जाईल. असे युवक फायर वाॅर्डन म्हणून ओळखले जातील. परिसरात आगीची दुर्घटना घडल्यास दलाचे बंब दाखल होण्यापूर्वीच्या उपाययोजनांचे प्रशिक्षण वाॅर्डनला दिले जाईल. 

भरतेश पॉलिटेक्‍निकमध्ये प्रशिक्षण सुरू झाले आहे. इतर महाविद्यालयांनीही काळाची गरज ओळखून पुढे येणे आवश्‍यक आहे. फायर वॉर्डन प्रशिक्षणासाठी युवक मंडळांनी पुढाकार घेतल्यास आणीबाणीच्या काळात असे युवक सर्वांना मदतीचा दुवा ठरतील. युवक मंडळांनी पुढे यावे.
-व्ही. एस. टक्केकर,  ठाणाधिकारी, अग्निशमन केंद्र, बेळगाव

Web Title: belgaon news NCC