बेळगाव : वसूल केलेले ३५ लाख गेले कुठे ?

वादाची शक्यता; ठेकेदाराने नगरसेवकांच्या नावाने वसुली केल्याने अस्वस्थता
belgaum municipal corporation
belgaum municipal corporationsakal

बेळगाव: महापालिकेत सध्या ३५ लाख रुपयांचीच चर्चा सुरू आहे. बेळगावातील एका ठेकेदाराने हे ३५ लाख रुपये जमा केले आहेत. बेळगाव शहराच्या स्वच्छतेचे काम करणाऱ्या ठेकेदारांकडून हे पैसे जमा करण्यात आले आहेत. महापालिकेवर नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना या पैशांचे वाटप केले जाईल, असे त्यावेळी सफाई ठेकेदाराना सांगण्यात आले होते. पण, पैसे जमा करून एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला, तरी त्यांचे वाटप झालेले नाही. हे पैसे जमा केल्याची माहिती नगरसेवकांपर्यंत पोचली आहे.

त्यांनी थेट ठेकेदारांशी संपर्क साधून याबाबत विचारणा केल्यावर ठेकेदारांनीही पैसे दिल्याचे मान्य केले आहे. मग पैसे गेले कोठे? याची चौकशी नगरसेवकांनी सुरू केली आहे. त्यावर ते पैसे ठेकेदार व एका नगरसेवकाकडे असल्याची माहिती त्यांना मिळाली आहे. त्यामुळे आता नगरसेवक अस्वस्थ झाले आहेत. पैसे तर मिळाले नाहीतच, पण त्यांच्या नावाने वसुली झाल्यामुळे बदनामी होत आहे. त्यामुळे महापौर निवडणुकीच्या आधी या ३५ लाख रूपयांवरून मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शहर स्वच्छतेचे काम करणाऱ्या ठेकेदारांकडून पैसे वसूल करण्याचा प्रकार नवा नाही. मागील सभागृहात तर ठेकेदारांकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी दोन नगरसेवकांनी घेतली होती. पैसे वसूल करून त्याचे वाटप केले जात होते. कोणत्या ठेकेदाराकडे किती प्रभागांच्या स्वच्छतेची जबाबदारी, कोणत्या ठेकेदाराचे महिन्याचे किती रूपयांचे बिल होते, त्यावर वसुलीची रक्कम ठरविण्यात आली होती. ठेकेदारांचे बिल झाले की लगेचच निर्धारीत रक्कम दोन नगरसेवकांकडे दिली जात होती.

त्या नगरसेवकांकडून पैशाचे वाटप केले जात होते. काही मोजके नगरसेवक पैसे घेत नव्हते, पण ही प्रथा सभागृह अस्तित्वात असेपर्यंत सुरू होती. गेल्या सभागृहातील बहुतेक नगरसेवकांचा मागील निवडणुकीत पराभव झाला त्यामुळे वसुलीचे शुक्लकाष्ठ टळले अशी चर्चा ठेकेदारांमध्ये होती. पण, महापालिकेतील बड्या अधिकाऱ्यांसोबत उठबस असलेल्या एका ठेकेदारानेच नगरसेवकांच्या नावाने पुन्हा वसुली सुरू केली. नगरसेवकांना द्यावे लागणार असल्याचे सांगून त्या ठेकेदाराने सफाई ठेकेदारांकडून तब्बल ३५ लाख रूपये वसूल केले आहेत. नगरसेवकांप्रमाणेच महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही याचा सुगावा लागला आहे. त्यामुळे महापालिकेत सध्या ३५ लाख रूपयांचीच चर्चा सुरू आहे.

शपथविधी आधीच शुल्ककाष्ठ मागे

नूतन नगरसेवक त्या ३५ लाख रुपयांमधील वाटा घेणार की नाही, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण, त्यांच्या नावे वसुली झाल्याने ते अस्वस्थ आहेत. नव्या नगरसेवकांचा अद्याप शपथविधी झालेला नाही. महापालिकेच्या कामकाजात अद्याप त्यांनी सहभागही घेतलेला नाही. त्याआधीच ३५ लाखांचे शुल्ककाष्ठ त्यांच्या मागे लागले आहे. त्यामुळे त्या ३५ लाखांबाबत नगरसेवकांनी स्पष्ट भूमिका घेण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com