Belgaum News: बेळगाव सर्वांत प्रदूषित शहर Belgaum city polluted state IQAR Institute Report | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Belgaum Air pollution

Belgaum News: बेळगाव सर्वांत प्रदूषित शहर

Belgaum News : गरिबांचे महाबळेश्‍वर म्हणून ओळखले जाणारे बेळगाव शहर कर्नाटकातील प्रदुषित शहरांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोचले आहे.

स्वित्झर्लंड येथील आयक्यूएअर या संस्थेने जगातील सात हजार ३२३ प्रदूषित शहरांमध्ये बेळगावचे स्थान आता १५९ इतके झाले आहे. पीएम २.५ या घटकाचे हवेतील प्रमाण वाढल्याने प्रदूषणातही वाढ होते.

बेळगावातील हवेमध्ये पीएम २.५ या घटकाचे प्रमाण २०२१ मध्ये २८.१ इतके होते, ते ४५ पर्यंत पोहोचले आहे. वर्षभरातच हे प्रमाण सात ते दहा पट इतके वाढले आहे.

पीएम म्हणजे पार्टीक्युलेट मॅटर. त्याचा आकार खूपच लहान असतो. हवेतील हा प्रदुषित घटक शरीरात अलगद प्रवेश करतो, तो शरीरात गेल्यानंतर अपायकारक ठरतो.

बेळगावातील हवेमधील या घटकाचे प्रमाण चिंताजनक आहे. कर्नाटकातील प्रदुषित शहरांच्या यादीत २०२१ साली बेळगाव शहर चौथ्या क्रमांकावर होते.

आता ते पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. २०२१ साली बेळगाव शहराच्या हवेतील पीएम २.५ जे २८.१ इतके प्रमाण होते, ते जागतिक आरोग्य संघटनेने निश्‍चित केलेल्या निकषापेक्षा सहा पट जास्त होते.

पीएम २.५ या घटकाचे प्रमाण वाढले की, मानवी आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. यामळे दमा (अस्थमा), हृदयविकार, फुफ्‍फुसाचे विकार वाढतात. बेळगावात गेल्या काही वर्षांपासून अस्थमा रूग्णांचे प्रमाण वाढले. त्याला हवा प्रदूषण हेच मुख्य कारण आहे.बंगळूर प्रदुषित शहरांच्या यादीत आठव्या स्थानावर आहे.

बेळगावपाठोपाठ गुलबर्गा शहर दुसऱ्या स्थानावर तर बंगळूर शहरालगत असलेले नेलमंगल तिसऱ्या क्रमांकावर आहे. धारवाड पाचव्या तर हुबळी सहाव्या स्थानावर आहे. कर्नाटकची सांस्कृतीक राजधानी असलेले म्हैसूर मात्र २३ व्या स्थानावर आहे.

बंगळूर किंवा हुबळी-धारवाडच्या तुलनेत बेळगावात औद्योगिक आस्थापनांची संख्या कमी आहे. तरीही बेळगावातील प्रदूषण मात्र वाढले आहे.

त्यामुळे बेळगावकरांसाठी ही चिंतेची बाब ठरली आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरात विकासकामे राबविली जात आहेत. त्यामुळे वृक्षतोड वाढली आहे. शहरीकरणही मोठ्या प्रमाणात झाले आहे. शहरातील वाहनांची संख्या वाढली आहे.

प्रदूषण वाढण्यात या सर्व घटकांचा हातभार लागला आहे. शहरातील प्रदूषण मोजण्यासाठी चन्नम्मा चौकात अद्ययावत उपकरण बसविण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी झाला होता, पण त्यासाठी जागा उपलब्ध झाली नाही.

प्रदूषण पातळी मोजण्यात अडचणी

महापालिका कार्यालयाच्या आवारात उपकरण बसविण्याचा निर्णय झाला, पण त्यालाही विरोध झाला. त्यामुळे ते उपकरण ऑटोनगर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाच्या आवारात बसविण्यात आले. त्यामुळे शहरातील प्रदूषण पातळी मोजण्यात अडचण येत असल्याचे मंडळाचे म्हणणे आहे.