बेळगाव : शाळांच्या दुरुस्तीसाठी १८ कोटी ५३ लाख रुपये मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Money

ग्रामीण भागातील नादुरुस्त शाळांच्या दुरुस्तीसाठी रोजगार हमी योजनेतून कामे हाती घेतली जात आहे.

बेळगाव : शाळांच्या दुरुस्तीसाठी १८ कोटी ५३ लाख रुपये मंजूर

बेळगाव - जिल्हा आणि तालुका पंचायत अनुदान तसेच ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या पंधराव्या वित्त आयोगातील अनुदानातून शाळांच्या दुरुस्तीसाठी १८ कोटी ५३ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

ग्रामीण भागातील नादुरुस्त शाळांच्या दुरुस्तीसाठी रोजगार हमी योजनेतून कामे हाती घेतली जात आहे. शाळा आणि अंगणवाडी इमारत बांधकामासाठी रोहयोची मदत मिळत आहे. त्यातच मागील आर्थिक वर्षात जिल्हा आणि तालुका पंचायत अनुदान व ग्रामपंचायतीना मिळणारे पंधरावे वित्त आयोगातील अनुदानातून देखील शाळांची दुरुस्ती केली जात आहे. जिल्ह्यातील ६२१ प्राथमिक शाळा आणि ५८ माध्यमिक शाळांमध्ये एकूण २,१५६ काम हाती घेण्यात आली आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या सरकारी शाळांच्या वर्गखोल्यांची दुरुस्ती, डेस्क, स्मार्ट क्लास निर्माण, पाणी व्यवस्था, स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यासह शाळांमध्ये क्लोज सर्किट कॅमेरे देखील बसवले जात आहेत.

यासह महिला आणि बालकल्याण खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या अंगणवाड्यांच्या दुरुस्ती आणि बांधकामासाठी देखील २० कोटी ४ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या अनुदानातून ग्रामीण भागातील ७९४ अंगणवाडीमध्ये स्मार्ट क्लास, लहान मुलांना बसण्याची व्यवस्था, खेळणी, शिक्षणाशी संबंधित साहित्य पुरवठा करण्यासह वीज आणि पाण्याची व्यवस्था देखील केली जात आहे. ग्रामीण भागातील अंगणवाड्यांवर मुलांना आकर्षित करणारी चित्रे देखील रेखाटण्यात येत आहेत. यासह अंगणवाडीची संबंधित अतिरिक्त ३३४ कामे देखील हाती घेण्यात आली आहे.

प्रतिक्रिया

ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेत जिल्हा आणि तालुका पंचायतीचे अनुदान तसेच पंधराव्या वित्त आयोगातील अनुदानाचा वापर शाळांच्या दुरुस्तीसाठी केला जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आवश्यक ती सर्व मूलभूत सुविधा शाळांमध्ये उपलब्ध करून दिली जात आहे.

-एच. व्ही. दर्शन, सीईओ, जिल्हा पंचायत