Belgaum : युवा मतदार नोंदणीत बेळगाव जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे Belgaum district youth voter registration topped the state | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

youth voter registration

Belgaum : युवा मतदार नोंदणीत बेळगाव जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे

बेळगाव : युवा मतदार नोंदणीत बेळगाव जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. विधानसभा निवडणूक बुधवारी (ता. २९) जाहीर झाली. त्यानंतर मतदारांचा आकडा जाहीर केला असून, त्यात दिव्यांग व ८० पेक्षा अधिक वयोगटांतील मतदारांचा तपशील दिला आहे. यासोबत तरुण मतदारांचा आकडा जाहीर केला असून, त्यात ७९ हजार युवा मतदार असल्याचा उल्लेख आहे.

बेळगाव राज्यातील सर्वांत मोठा जिल्हा आहे. २ लोकसभा व १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. यामुळे जिल्ह्यात युवा मतदारांची संख्या अधिक आहे. जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत निवडणुकीची माहिती देताना जिल्ह्यातील मतदारांची संख्या ३८,३३,०३७ इतकी असल्याचे सांगितले.

यांपैकी १९ लाख ३६ हजार ८८७ पुरुष मतदार व १८ लाख ९६ हजार १५० मतदार महिला मतदार आहेत. युवा मतदारांची संख्या ७९ हजार आहे, अशी माहिती दिली. यानंतर बंगळूर, म्हैसूरचा क्रमांक आहे. त्यामुळे सर्वाधिक युवा मतदार बेळगाव जिल्ह्यात आहेत.

दरम्यान, मतदारांची अंतिम यादी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणाऱ्या अखेरच्या दिवसांपर्यंत अपडेट करण्यात येते. त्यामुळे तरुण मतदार यादीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी कळविले होते. त्याला व्यापक प्रतिसाद मिळाला. २९ मार्च २०२३ अखेरपर्यंत १८ व १९ वयोगटातील ७९ हजार तरुणांची भर पडली आहे. निवडणुकीमध्ये युवा मतदारांना विशेष महत्त्व असते. राजकीय पक्ष, विद्यमान आमदार आणि इच्छुकांकडून या स्वरुपाच्या मतदारांकडे विशेष लक्ष असते. यामुळे प्रत्येक निवडणुकीत युवा मतदार चर्चेचा विषय असतो.

अरभावीत सर्वाधिक तरुण मतदार

जिल्ह्यात अरभावी मतदारसंघात सर्वाधिक ५,९२४ तरुण मतदार आहेत. त्यानंतर अथणी मतदारसंघाचा क्रमांक असून, ५,४१० मतदारांची नोंद आहे. बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वांत कमी ३,३९४ तरुण मतदारांची नोंद असल्याचा उल्लेख आहे.