बेळगाव : शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांना ऑगस्ट महिन्यापर्यंत घरोघरी जाऊन पुस्तके वितरित करण्याचा विचार सुरू केला आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अधिक विलंब होण्याची शक्यता गृहीत धरून हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास मोठा विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिक्षण खात्याची चिंता वाढली असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासह शाळा कशाप्रकारे सुरू करता येईल, याकडे शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. मात्र कोरोनाचा धोका लक्षात घेता शाळा सुरू करताना शिक्षण खात्याला पूर्ण विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यापर्यंत शाळा सुरू झाल्या नाही, तर विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन पुस्तके वितरित करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वितरण केले जाते. मात्र गेल्या वर्षीही शाळा बंद असल्याने गणवेश व पाठ पुस्तके वेळेत देण्यास अडचण झाली होती. त्यामुळे ‘विद्यागम’ योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिकविताना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली होती. तर काही विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून पुस्तके दिली. मात्र यावेळी शाळा वेळेत सुरू होईल, असा विश्वास शिक्षण खात्यातून व्यक्त केला जात होता.
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे पुस्तके वेळेत उपलब्ध करून देताना अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन पुस्तके वाटप करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांना लाभदायक ठरेल. त्याबरोबरच विद्यार्थ्यांना आवश्यक ते पाठही उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अन्यथा विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. याकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.
"शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास विलंब झाला, तर विद्यार्थ्यांना पुस्तके लवकर वितरीत केली जातील. सध्या कोरोनाच्या संकटामुळे अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे विविध पर्यायांबाबत विचार सुरू आहे."
- ए. बी. पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.