Belgaum : फुग्यासह उपकरणे आढळल्याने खळबळ Belgaum equipment including balloons Excitement | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इलेक्ट्रॉनिक

Belgaum : फुग्यासह उपकरणे आढळल्याने खळबळ

बेळगाव : पांढऱ्या रंगाच्या मोठ्या फुग्याबरोबर इलेक्ट्रॉनिक उपकरणे आढळल्याने आज बैलहोंगल तालुक्‍यातील गद्दीकरवीनकोप्प गावात खळबळ माजली. याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासाअंती तो हवामान खात्याचा ‘वेदर बलून’ असल्याचे स्पष्ट होताच सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

दुपारपर्यंत त्या बलूनबाबत उलट सुलट चर्चा सुरु होती. अलीकडेच चीनने बलूनच्या माध्यमातून हेरगिरी सुरु केल्याचे आरोप काही देशांनी केले आहेत. त्यामुळे, गद्दीकरवीनकोप्पमध्ये सापडलेला बलून चर्चेचा विषय ठरला.

आज गद्दीकरवीनकोप्पमधील एका शेतात पांढऱ्या रंगाचा मोठा फुगा आढळून आला. फुग्याजवळ काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही माहिती बैलहोंगल पोलिसांना देण्यात आली. पोलिसानी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. संजीव पाटीलही धावले.

त्यानंतर तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. तपासाअंती सदर फुगा हवामान खात्याचा ‘वेदर बलून’ असल्याचे स्पष्ट झाले. उच्च उंचीवरील तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, हवेचा दाब आदी मोजण्यासाठी हे उपकरण वापरले जाते. ‘वेदर बलून’ रबरी असून हवेत उंच उडण्यासाठी त्यात हायड्रोजन भरलेला असतो.

सुमारे दीड तास तो हवेत राहू शकतो. त्याला जीपीएस आणि ट्रान्समीटर बसविलेले असते. त्याची उपग्रहांद्वारे माहिती घेतली जाते. त्यामुळे, भीती बाळगण्याची गरज नाही, असे जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. पाटील यांनी कळविले आहे.