शतकोत्तर प्रवासाचा साक्षीदार "पाळणा"! दिग्गजांसह शंभरावर बाळांचे बारशे 

संजय साळुंखे | Thursday, 21 January 2021

मणगुत्तीच्या पाटील घराण्यात जपणूक  

निपाणी (बेळगाव) : बाळ, बाळंतीण, बारशे आणि त्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा पाळणा त्यांच्यातील अतूट नाते आयुष्यभर टिकते. चार पिढ्यांशी भावनिक संबंध असलेला एक ऐतिहासिक ऐवज मणगुत्ती (ता. हुक्केरी) येथील पाटील घराण्याने जपला आहे. सन १९१४ पासून तब्बल १०७ वर्षांच्या प्रवासात ह्या ऐतिहासिक ऐवजात  अनेक मान्यवरांचा सहवासही लाभला आहे. गुरुवारी (ता. २१) चौथ्या पिढीतील बाळाचे बारसे याच पाळण्यात होत आहे. त्या निमित्ताने या पाळण्याशी संबंधित अनेक आठवणींना उजाळा मिळत आहे. 

 पाटील घराण्यात असलेल्या पाळण्याच्या इतिहासाची दोरी खूप लांबवर जाते. मणगुत्तीमधील गंगाबाई दत्ताजीराव पाटील यांचे माहेर उचगाव (बेळगाव). त्या दिवंगत आमदार प्रभाकर पावशे यांच्या आत्या. गंगाबाईंना 1914 साली पहिला मुलगा झाला. त्यांचे नाव लक्ष्मणराव उर्फ अप्पासाहेब पाटील. बाळंतपणानंतर त्यांच्यासोबत माहेरहून उचगाव येथून आलेला हा पाळणा. त्यात गंगाबाईंची 9 मुले खेळली, बागडली. त्यानंतर दुसऱ्या पिढीतील नानासाहेब पाटील यांची 8 मुले याच पाळण्यात मोठी झाली.

Advertising
Advertising

तिसऱ्या पिढीतील पणतवंडे असलेल्या काही डझन बाळांचे संगोपनही याच पाळण्यात झाले. पाटील घराण्यातील आत्या, बहिणी व सूनांची लेकरे त्यातच खेळली. आता दुसऱ्या पिढीतील विश्वास पाटील यांची लहान मुलगी गंगा हिला 2 डिसेंबर रोजी कन्यारत्न झाले आहे. घराण्यातील हे चौथ्या पिढीतील बाळाचे बारसे याच पाळण्यात गुरुवारी (ता. 21) होणार आहे. कन्येच्या वडिलांच्या पसंतीनुसार तिचे नामकरण 'यशोमती', असे करण्यात येणार आहे. त्यामुळे पाटील घराण्यात बारशाच्या तयारीची एकच धांदल उडाली आहे.

'देशी'पण टिकविण्यासाठी न रंगविण्याचा निश्चय 

1914 साली तयार केलेला हा पाळणा अस्सल सागवानी लाकडाचा आहे. पूर्वी त्यावर सोंगट्यावरील चित्रांप्रमाणे सुंदर रंगीत पारंपरिक चित्रे होती. ती कालौघात फिकट, पुसट झाली आहेत. काळानुरुप पाळण्याचा तळ थोडा दुरुस्त केला आहे. पाळण्याचे 107 वर्षांचे 'देशी'पण टिकविण्यासाठी न रंगविण्याचा निश्चय पाटील घराण्याने केला आहे.

सुधीर सावंत

 ब्रिगेडियर, माजी खासदार सुधीर सावंत हे खेळलेला पाळणा 

गंगाबाई यांचे थोरले चिरंजीव लक्ष्मणराव उर्फ अप्पासाहेब पाटील यांच्या ज्येष्ठ कन्या म्हणजे आशादेवी सीताराम सावंत (भिरवंडे, ता. कणकवली) होय. सीताराम सावंत हे शेकापचे कणकवलीचे तीनवेळा आमदार होते. या दांपत्याचे एकुलते चिरंजीव म्हणजे ब्रिगेडियर सुधीर सावंत (निवृत्त). मेजर असताना त्यांनी नोकरी सोडून ज्येष्ठ नेते मधू दंडवते यांच्याविरुध्द राजापूर मतदार संघातून काँग्रेसतर्फे लोकसभेची निवडणूक जिंकली होती. त्यांचा जन्म आजोळी मणगुत्ती येथे झाला. ते देखील याच पाळण्यात खेळले-बागडले. जन्मस्थान असलेली 'आईची खोली' व पाळणा याविषयी त्यांना अद्यापही अप्रुप आहे. 

 
 'गंगाबाई ते गंगा'चा 'यशोमती'पर्यंत प्रवास 

गंगा ही दुसऱ्या पिढीतील विश्वास पाटील यांची लहान कन्या. आजीची अर्थात गंगाबाईंची आठवण म्हणून तिचे नाव गंगा ठेवले आहे. तिचे सासरचे नाव गंगा चंद्रकांत हराडे (रा. कोट, ता. हुक्केरी). तिच्याच बाळाचे बारशे होत असून 'गंगाबाई ते गंगा' असा चौथ्या पिढीकडे पाळण्याचा प्रवास अन् परिसस्पर्श 'यशोमती'च्या नामकरणाने होत आहे.

 'आईची खोली'ची माया अन् लळा! 

मणगुत्तीमध्ये पाटील यांच्या घरी खास 'आईची खोली' नावाची खोली आहे. तेथेच सर्व बाळंतिणी चार-पाच महिने बाळाचे संगोपन करतात. आजही या खोलीने वेगळेपण जपत चार पिढ्यांना माया व लळा लावलेला आहे. 

 'आमचे मोठे काका अप्पासाहेब पाटील यांच्या बारशाच्या वेळचा हा 1914 सालचा पाळणा आहे. त्याच्या रूपाने आजवरच्या चार पिढ्यांचा भावबंध जपताना खूपच आनंद होत आहे. अशा या छोट्या वस्तूंतून पूर्वजांचे संस्कार पुढील पिढ्यात उतरत असतात, त्याचे समाधान वाटते.' 
-शरद पाटील, मणगुत्ती
 
'माझे आजोबा, वडील, मी व सर्व माहेरची मंडळी मोठी झाली, त्याच पाळण्यात माझ्या कन्येचे बारशे होत आहे. त्यामुळे आणखी एक पिढी त्याच्याशी जोडली गेल्याने होणारा आनंद मोठा आहे. 

-गंगा चंद्रकांत हराडे, ता. हुक्केरी

संपादन- अर्चना बनगे