बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात; ४२ परीक्षा केंद्रे सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

HSC Board Exam

बारावीची परीक्षा अवघ्या एक दिवसावर आली आहे. गुरुवारपासून (ता. ९ ) परीक्षेला सुरुवात होत आहे.

HSC Exam : बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात; ४२ परीक्षा केंद्रे सज्ज

बेळगाव - बारावीची परीक्षा अवघ्या एक दिवसावर आली आहे. गुरुवारपासून (ता. ९ ) परीक्षेला सुरुवात होत आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाची धाकधूक वाढली असून शिक्षण खात्याने परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. तसेच बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील ४२ परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेश क्रमांक घालण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सर्व ४२ परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे परीक्षा सुरळीत पार पडण्यास मदत होणार असून प्रथम भाषा विषयाने परीक्षेला सुरुवात होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर उपस्थित राहण्याची मुभा आहे.

विद्यार्थ्यांना आपला क्रमांक कोणत्या ठिकाणी आला आहे याची माहिती मिळणार आहे. काही दिवसांपासून शिक्षण खात्याने सर्व परीक्षा केंद्रांचा आढावा घेण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार सर्व केंद्रावर आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता केली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील २५३९० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. गुरुवार (ता. ९) ते बुधवार (ता.२९) मार्चपर्यंत बारावीची परीक्षा होणार आहे. त्यासाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात दिले आहे.

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात बेळगाव शहरात बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असून वाणिज्य व विज्ञान शाखेचे विद्यार्थी शैक्षणिक जिल्ह्यात अधिक प्रमाणात आहेत. सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र शौचालय, स्वच्छ पिण्याचे पाणी, यासह वर्ग खोल्यांत आवश्यक असलेली डागडुजी करण्याची सूचना पदवी पूर्व शिक्षण खात्याने केली आहे. कोरोना काळात सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केले नव्हते. मात्र, यावेळी सर्व केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे.

परीक्षा केंद्र परिसरात जमाव बंदी

४२ परीक्षा केंद्रांवरील मुख्य परिवेक्षकांची नेमणूक करण्याचे काम पूर्ण केले असून परीक्षा काळात परीक्षा केंद्र परिसरात जमाव बंदी लागू असणार आहे. परिसरातील झेरॉक्स दुकानेदेखील बंद ठेवावी लागणार आहेत. परीक्षेला कमी कालावधी शिल्लक असल्याने विद्यार्थी व पालकांची धाकधूक वाढली आहे.