
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ८० पेक्षा अधिक वय झालेल्या ज्येष्ठ नागरिक, अपंगांना टपालद्वारे मतदानाचा अधिकार असणार आहे.
Karnataka Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठांना टपाली मतदानाचा अधिकार
बेळगाव - कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ८० पेक्षा अधिक वय झालेल्या ज्येष्ठ नागरिक, अपंगांना टपालद्वारे मतदानाचा अधिकार असणार आहे. निवडणुकीत कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने निवडणूक आयोगाने सुरक्षित मतदान प्रक्रियेचा पर्याय हाती घेतला आहे.
युवा मतदारांचा आकडा लक्षणीय आहे. दुसरीकडे काही घटकांना मतदान केंद्रापर्यंत जाता येत नाही. त्यासाठी या स्वरूपाच्या मतदारासाठी अभिनय योजना हाती घेण्यात येत आहे. पोस्टल मतदानाचा पर्याय देण्यात येत आहे. या स्वरूपाचा पर्याय लोकसभा पोटनिवणुकीत दिला होता. आता विधानसभा निवडणुकीत त्याची अंमलबजावणी केली जात आहे.
निवडणूक कर्मचारी, लष्कर जवान आणि निवडणुकीत बंदोबस्ताची जबाबदारी असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा पर्याय दिला जातो. त्याप्रमाणे आता ८० पेक्षा अधिक वय झालेल्या व दिव्यांग मतदारांना पोस्टल मतदानाचा अधिकार देण्यात येत आहे. दृष्टिहीन मतदारासाठी ब्रेल लिपी विकसित करून त्याद्वारे मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जातो. आता आणखी काही मतदार जोडून मतदानाचा टक्का वाढविला जात आहे. अपंग व ज्येष्ठ नागरिक वंचित राहू नयेत, या उद्देशाने पर्याय प्रणाली हाती घेण्यात येत आहे. मागील काही निवडणुकीत सरासरी मतदान झाले नाही. सरासरीपेक्षा कमी मतदान शहरी भागात झाल्यामुळे आयोगाकडून या दिशेने तयारी केली जात आहे.
कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण
निवडणूक विभागाकडून मतदार जागृती कार्यक्रम सुरू आहेत. प्रात्यक्षिके सादर करण्यात येत आहेत. त्यासोबत निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. यात पोस्टल मतदान कसे घेता येईल, त्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.