Belgaum : काळजी घ्या... तापमानाचा पारा वाढतोय

जिल्ह्यात यंदा फेब्रुवारीपासूनच पारा वाढू लागला आहे.
 बेळगावचे कमाल तापमान अधिक वाढले
बेळगावचे कमाल तापमान अधिक वाढलेsakal

बेळगाव : सूर्य अक्षरश: आग ओकू लागला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमान ३७.७ अंशांवर गेल्याने उन्हाचा जबर तडाखा बेळगावकर सहन करत आहेत. अचानक वाढलेल्या तापमानामुळे संसर्गजन्य आजारांसह आता उष्माघाताचा धोका वाढला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून उकाड्याची जाणीव अधिक तीव्र झालेली आहे. बेळगावचे कमाल तापमान अधिक वाढले. हे तापमान पुढील दोन दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत राज्यात अचानक तापमानाचा पारा चाळिशीच्या घरात उसळला आहे. घामाच्या धारा आणि वाढत्या उष्णतेचा लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच त्रास जाणवायला सुरुवात झाली आहे.

जिल्ह्यात यंदा फेब्रुवारीपासूनच पारा वाढू लागला आहे. प्रत्येक महिन्याला तापमानात वाढ होत असून, त्याचा जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे. उष्म्याने लहान मुले व वयोवृद्धांना अधिक त्रास होत आहे. जनावरांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. त्यातून दूध उत्पादन घटू लागले आहे.

उन्हाळ्यात आपण काळजी घेणे आवश्‍यक आहे. यासाठी उन्हाळ्यात शक्यतो सुती कपड्यांचा वापर करावा. त्वचा लालसर अथवा त्वचेवर फोड आले असतील, तर वैद्यकीय सल्ला घ्यावा. हाता-पायात गोळे, डोळ्यासमोर अंधारी येत असल्यास सावलीत थांबावे. थोडे-थोडे पाणी प्यावे. दिवसातून तीन ते चार लिटर पाणी प्यावे.

उन्हात बाहेर फिरताना टोपी, छत्री, सनकोट, स्टोल, स्कार्फचा वापर करावा. वाढत्या तापमानाचा शरीरावर घातक परिणाम होतो. तापमान ३७ अंशांपर्यंत असल्यास त्याचा शरीरावर फारसा परिणाम होत नाही. मात्र, तापमान ३७ च्या पुढे गेल्यास वातावरणातील उष्मा शोषून घेऊ लागते आणि त्याचे घातक परिणाम मानवाच्या शरीरावर होऊ लागतात. यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.

सायंकाळी पावसाच्या सरी

बुधवारी सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. रात्री ६.३० च्या दरम्यान अचानक पाऊस पडल्याने अनेकांची धावफळ उडाली. शहरात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच ग्रामीण भागात देखील काही भागातच पाऊस झाला. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडल्या. यामुळे रात्री थोडा थंडावा मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com