Belgaum : महापौर, उपमहापौरपद दक्षिण विभागाकडेच?

आरक्षणामुळे समस्या, विरोधी गटाकडूनही मोर्चेबांधणी
Belgaum Municipal Corporation
Belgaum Municipal Corporationsakal

बेळगाव : भारतीय जनता पक्षाकडून सामान्य प्रवर्गातून निवडून आलेल्या अनगोळ येथील नगरसेविकेला उपमहापौरपदी संधी दिली जाणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्या नगरसेविकेचे इतर मागास ‘ब’ प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रयत्नही सुरू झाले. हा प्रयत्न यशस्वी झाला

तर या वेळी महापौर व उपमहापौर ही दोन्ही पदे बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांना मिळणार आहेत. दरम्यान, सामान्य प्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेविकेला इतर मागास प्रवर्गाचे प्रमाणपत्र देताना नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी विरोधी गटाचे नगरसेवकही दक्ष झाले आहेत.

यासंदर्भात विरोधी नगरसेवकांनी प्रादेशिक आयुक्त, जिल्हाधिकारी यांना आधीच निवेदन दिले आहे. पण प्रत्यक्षात प्रमाणपत्र वितरण करताना नियामांचे पालन केले जाते का? यावर विरोधी नगरसेवक लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान महापौर निवडणुकीबाबत प्रादेशिक आयुक्‍त एम.जी. हिरेमठ यांनी शुक्रवारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला अप्‍पर प्रादेशिक आयुक्तांसह अन्य अधिकारी उपस्थित होते. महापौर निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होते.

त्यावेळी प्रादेशिक आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तेथे उपस्थित असतात. त्यामुळे निवडणुकीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्याची सूचना प्रादेशिक आयुक्तांकडून देण्यात आली.

महापालिकेकडूनही निवडणुकीची तयारी सुरू आहे. महापालिकेत पूर्णवेळ कौन्सिल सेक्रेटरी म्हणून सिद्धी हुल्लोळी यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी या पदाची सूत्रे स्विकारली आहेत. पालिकेच्या कौन्सिल विभागातील कर्मचाऱ्यांना सोबत घेवून त्यांनी निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे.

महापौर, उपमहापौर पदासाठीचे उमेदवारी अर्ज तयार करणे, स्थायी समिती निवडणुकीसाठी आवश्‍यक अर्ज व अन्य माहिती तयार करण्याचे काम सुरू आहे. काही वर्षांपासून महापालिकेच्या कौन्सिल विभागाची जबाबदारी सांभाळणारे एच. बी. पिरजादे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्न व नागरी पुरवठा विभागात बदली झाली आहे. त्यामुळे पूर्वतयारी करताना कौन्सिल विभागाला काही अडचणी येत आहेत.

स्थायी समितीवर भाजपच्या चार,तर विरोधी तीन नगरसेवकांना संधी

६ फेब्रुवारीला महापौर व उपमहापौर निवडणूक होणार आहे. प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महापौर व उपमहापौर निवड झाल्यानंतर लगेचच स्थायी समित्यांची रचना केली जाते. ही प्रक्रिया नूतन महापौरांच्या अध्यक्षतेखाली केली जाते.

२००९ चा अपवाद वगळता बेळगाव महापालिकेत स्थायी समित्यांची रचना बिनविरोध झाली आहे. या वेळीही महापालिकेत भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत असल्यामुळे स्थायी समित्यांची रचना बिनविरोध होवू शकते. भाजपच्या चार तर विरोधी गटाच्या तीन नगरसेवकाना समित्यांवर संधी मिळू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com