Photo : वाघांच्या सहवासात रमणारा अभियंता : छायाचित्रांच्या माध्यमातून करताहेत वाघांबद्दल जागृती...

सुनील गावडे
Wednesday, 29 July 2020

देशविदेशाती वाघांना आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले आहे.

बेळगाव : पेशाने ते मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. बंगळूरमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत उच्चपदावर कार्यरत असूनही त्यांना वन्यजीवांचे प्रचंड वेड आहे. वाघ हा त्यांचा 'विक पॉईंट' आहे. या प्रेमापोटीच आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत त्यांनी देशविदेशाती वाघांना आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले आहे. प्रवीण सिद्दणावर असे या बेळगावकर व्याघ्रप्रेमीचे नाव आहे.

प्रवीण यांचे शालेय शिक्षण सेंट पॉल्स व बेळगाव मिलिटरी स्कूलमध्ये झाले. आरएलएस कॉलेजमधून बारावी केल्यानंतर  त्यांनी अभियांत्रिकी पदवी मिळवली. बेळगावसारख्या निसर्गरम्य परिसरात वाढल्याने त्यांना पर्यावरणाची आवड आधीपासूनच होती. सॉफ्टवेअरसारख्या रुक्ष क्षेत्रात गेल्यानंतरही त्यांचे निसर्गप्रेम कमी झाले नाही. उलट छायाचित्रणाच्या माध्यमातून त्यांनी ही आवड जोपासली. इतकी की आज देशातील नामवंत वन्यजीव छायाचित्रकारांमध्ये त्यांची गणना होते. 

हेही वाचा- शिक्षण मंत्री म्हणतात, शाळा कधी सुरु होणार मला माहित नाही.... -

त्यांचा वन्यजीव छायाचित्रकार बनण्याचा प्रवास 2009 मध्ये सुरु झाला. वन्यजीव छायाचित्रणात त्यांचा फोकस कायम वाघांवरच राहिला आहे. जंगलात वाघाचे सहजासहजी दर्शन मिळणे सोपे नसते. त्यासाठी खूप संयम व चिकाटी लागते. मात्र, याबाबत प्रवीण खूप सुदैवी ठरले आहेत. देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये छायाचित्रण करताना त्यांनी वाघांच्या अनेक दुर्मिळ छबी टिपल्या आहेत. त्यातूनच त्यांचा वाघांशी एक अतूट नाते निर्माण झाले. छायाचित्रणाबरोबरच ते वाघांच्या सवयी व नैसर्गिक अधिवासाचाही अभ्यास करतात. त्यावर चित्रकथा प्रसिद्ध करुन वाघांबद्दल जागृतीही करतात. 

हेही वाचा-किरण पोटे यांचा कल्टी  मराठी सिनेमा पुरस्काराचा मानकरी -

मार्जारवर्गातील प्राण्यांच्या प्रेमापोटी त्यांनी अनेक देशही पालथे घातले आहेत. ब्राझीलला जाऊन वाघाचा भाऊबंद जग्वारचेही छायाचित्रण केले आहे. तसेच केनिया व टांझानियात चित्यांचाही अभ्यास केला आहे. वाघांसह सिंह, बिबटे, चिता व जग्वारची अवघ्या दहा-पंधरा फुटावरुन छायाचित्रे घेतली आहेत. अॅनाकोंडालाही जवळून पाहिले आहे. निसर्गातील दुर्मिळ क्षण कॅमेराबद्ध करुन ते संपूर्ण जगभर पसरविणे हा त्यांचा छंदच बनला आहे. प्रवीण इंडियन वाइल्डलाईफ कन्झव्हेशन ट्रस्टचे (IWCT) संस्थापक सदस्य असून सध्या उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत. ही संस्था वन्यजीव संवर्धन व संरक्षणाचे काम करते. 

 

हेही वाचा-अयोध्येच्या भेटीला हिरण्यकेशीचे पाणी...राम मंदिर भूमीपूजन सोहळ्यात गडहिंग्लजवासीयांनी असा नोंदविला सहभाग -

त्यांच्या छायाचित्रांना ३० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारही लाभले आहेत. त्यात बीबीसी वाइल्डलाइफ मॅगझिन व लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियमचा "व्हेओलिया एनव्हायर्नमेंट वाइल्डलाइफ फोटोग्राफर' व कॅनडा-सिंगापूर इंटरनॅशनल फोटोग्राफी पुरस्काराचा समावेश आहे. त्यांची छायाचित्रे व चित्रकथा देशविदेशातील १२५ हून अधिक नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. लंडन, न्यूयॉर्क, पोर्तुगाल, इराक, दुबईसह देशातील अनेक प्रदर्शनात त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. फेसबुकवर त्यांचे २.६५ लाख फॉलोअर्सही आहेत. सध्या ते बंगळूरस्थित बिर्लासॉफ्ट लिमिटेडमध्ये उपाध्यक्षपदावर कार्यरत आहेत.

'वाघ ही परमेश्वराची पृथ्वीवरील अतिशय सुंदर निर्मिती आहे. जंगलात जायला लागल्यापासूनच मला वाघाचे आकर्षण होते. त्यामुळेच छायाचित्रणात मी वाघाला प्राधान्य दिले. वाघांची संख्या वाढावी हाच माझा उद्देश आहे. टिपलेला प्रत्येक फोटो त्या वन्यजीवाच्या संवर्धनासाठी उपयोगी पडावा यासाठी मी प्रयत्नशील असतो.'
- प्रवीण सिद्दण्णावर, वन्यजीव छायाचित्रकार 

संपादन - अर्चना बनगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: belgaum Mechanical engineer Hobby Tiger Wildlife photography marathi news