यंदा ७५ लाख पणत्यांचे खानापुरात उत्पादन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

खानापूर -  चीनमधून आलेल्या पणत्यांकडे ग्राहकांनी गतवर्षी पाठ फिरविल्याने यंदा स्थानिक कुंभार समाजातील कारागिरांनी बनविलेल्या मातीच्या पणत्यांना मागणी वाढली आहे. पारंपरिक पणत्यांबरोबरच राजस्थान, कोलकात्यातील कलाकुसरीच्या कलात्मक पणत्या तयार करण्यावर तालुक्‍यात भर देण्यात येत आहे. यंदा लाकडाचा दर वधारल्याने मातीच्या पणत्यांच्या दरात किंचित वाढ केली आहे. गतवर्षी ८० ते ९० पैशाला एक होलसेल पणती मिळत होती तो दर यंदा ९० पैसे ते १ रुपया असा आहे. तालुक्‍यात यंदा ७५ लाखांच्या घरात पणत्या तयार केल्या जाणार आहेत. 

सध्या पणत्या रंगवण्याचे काम चालू आहे. किरकोळ दर डझनाला ५० रुपये आहे. गतवर्षी बेळगाव बाजारपेठेत राजस्थानी व कोलकात्यातील कलाकारांनी बनविलेल्या पणत्यांनी ग्राहकांना भुरळ घातली होती. त्या तोडीच्या पणत्या बनविण्याचे प्रशिक्षण तालुक्‍यातील १० युवा कलाकारांनी बंगळूर येथे नुकतेच घेतले आहे. त्या धर्तीवर पणत्या बनवण्याचे काम चालू केले आहे. गतवर्षी ५० लाख पणत्या केवळ गर्लगुंजीत तयार झाल्या होत्या. एक कलाकार सरासरी ५० हजार ते १ लाख पणत्या बनवितो. तालुक्‍यात सर्व गावात मिळून १५० कलाकार पणत्या बनविण्याचे काम करीत आहेत.

दरवर्षी गोव्यात मातीच्या पणत्या विक्रीस नेतो. गतवर्षी चिनी बनावटीच्या पणत्यांकडे ग्राहकांनी पाठ फिरविली. त्यामुळे मातीच्या पणत्यांना मागणी वाढली आहे. यंदा आपण पाच लाख पणत्या बनविल्या आहेत.
-अमर कुंभार, कुंभार, घोटगाळी 

येथे बनतात पणत्या
खानापूर, गर्लगुंजी, तोपिनकट्टी, सिंगिनकोप, फुलेवाडी, विश्रांतवाडी, जांबोटी, नागुर्डा, वत्तोळी, माडीगुंजी, हेब्बाळ, लालवाडी, नंदगड, घोटगाळी, कापोली येथे पणत्या तयार केल्या जातात. साधी पणती, मासा पणती, गणपती पणती, हत्ती पणती, मोर पणती, बदक पणती, कासव पणती, कलारती, आरती, स्टॅण्ड पणती अशा विविध प्रकारच्या पणत्या बनविल्या जातात. गोवा, बंगळूर, हुबळी, धारवाड, मुबंई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी येथून पणत्यांना मोठी मागणी असते. 

होलसेल दर
 पणती मोठी १००० रुपयाला १००० पणत्या
 लहान पणती ९०० रुपयाला १००० पणत्या
 कलारती अडीच रुपयांना एक
 देवदेवतांच्या प्रतिकृती असलेली पणती १५ रुपयांना एक

Web Title: belgaum news dipawali lamp prodution in Khanapur