रंगांवरील जीएसटीमुळे शाडू मूर्तीच्या दरात वाढ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

विविध अवतारांमध्ये मूर्ती उपलब्ध 
बाहुबली, जय मल्हार, जोतिबा अवतार, कासव गणपती, विष्णू आवतार, कार्टून बाल गणेश, दगडुशेठ हलवाई, लालबागचा राजा, गरूडारूढ गणपती, श्रीकृष्ण गणपती, कालियामर्दन, सिंहासनावरूढ गणपती, तिरूपती बालाजी, पांडुरंग अवतार, शेतकरी अवतार गणपती, अष्टविनायक गणपती मूर्तींना मोठी मागणी आहे. 

बेळगाव : यंदा राज्य प्रशासनाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींवर बंदी घातल्याने गणेशभक्‍तांकडून शाडू मूर्तींना मागणी वाढली आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून मूर्तिकारांची लगबग सुरू आहे. पीओपीच्या तुलनेत मूर्तिकारांकडून घरगुती शाडूच्या मूर्तीसाठी जादा दर आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. पण, शाडूची उपलब्धता, रंगांचे दर आणि इतर साहित्याचे दर भरमसाठ वाढल्याने 500 ते 2500 रूपयांपर्यंत दर आकारले जात आहेत. पण, काही झाले तरी यंदा पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाचे वातावरण राहणार आहे. 

प्रदूषण नियंत्रण मंडळाने यंदा संपूर्ण पीओपी मूर्तींवर वर बंदी घातली आहे. त्याची अंमलबजावणी बेळगावातही होत आहे. तसे असले तरी काही मूर्तिकारांनी पीओपी गणेशमूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत. शाडूची मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांची संख्या कमी आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी शाडूच्या मूर्ती उपलब्ध होणे कठीण आहे. गतवर्षी शाडूची मूर्ती 200 ते 400 रूपयांपर्यंत विकली जात होती. यंदा त्यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. यंदा पीओपीवर बंदी घालण्यात आली तरी बऱ्याच मूर्तिकारांची मानसिकता बदलण्यास वेळ लागणार आहे. 

वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेत येत नसल्याने गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या काही प्रकारच्या साहित्यावरील करामध्ये साडेनऊ टक्के कपात झाली आहे. मात्र, 1 जुलैपासून रंगांवर जीएसटी लागू झाल्याने मूर्तीच्या दरात वाढ झाली आहे. प्रदूषणामुळे शाडूच्या मूर्तींना पसंती दिली तरी दर वाढल्याने नाराजी आहे. शाडूची कमतरता असल्याने विविध ठिकाणाहून वाहतूक खर्च करून ती आणावी लागते. तसेच रंगांसाठी वाढीव खर्च, कारागिरांची मजुरी अशा खर्चामुळे दरवाढ अनिवार्य असल्याचे मूर्तिकार सांगतात. शाडूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा सल्ला पर्यावरणवादी देतात. त्यामुळे कारांगिरांनीही शाडूची मूर्ती तयार करण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्‍त होत आहे. 

विविध अवतारांमध्ये मूर्ती उपलब्ध 
बाहुबली, जय मल्हार, जोतिबा अवतार, कासव गणपती, विष्णू आवतार, कार्टून बाल गणेश, दगडुशेठ हलवाई, लालबागचा राजा, गरूडारूढ गणपती, श्रीकृष्ण गणपती, कालियामर्दन, सिंहासनावरूढ गणपती, तिरूपती बालाजी, पांडुरंग अवतार, शेतकरी अवतार गणपती, अष्टविनायक गणपती मूर्तींना मोठी मागणी आहे. 

पीओपी बंदीमुळे यंदा शाडू मूर्तींना मोठी मागणी आहे. गणेशभक्तांना परवडेल असे दर मूर्तिकारांनी आकारावेत. सध्या 500 पासून 2500 रूपयांपर्यंत घरगुती शाडू मूर्तीचे दर आहेत. मोठ्या मूर्ती तीन हजार रूपये फूट याप्रमाणे दर आकारले जात आहेत.' 
- यल्लाप्पा पालकर गणेश मूर्तिकार 

Web Title: Belgaum news GST effect in ganest statue price