वादळी वाऱ्यासह पावसाने बेळगावची दैना 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

बेळगाव - वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने आज शहराच्या अनेक भागाची अक्षरशः दैना उडाली. विद्युत खांब, प्रांताधिकारी कार्यालयातील भिंतीसह शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळली. शिवाय महापालिकेने गटारी स्वच्छ न केल्यामुळे बाजारपेठ, उपनगरांसह अनेक वसाहतींमध्ये आस्थापने व घरांमध्ये पाणी शिरले.

आज साडेचारच्या सुमारास विजेचा गडगडाट, वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. त्यामुळे बाजारपेठेसह पादचारी व रस्त्यावरील दुचाकीधारकांची एकच धावपळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे झाडे, फलक व विद्युत खांब कोसळण्यास सुरवात झाली. जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या रस्त्यावर आधी विद्युतखांब कोसळला तर याच्या तारा झाडावर पडल्यामुळे फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या. चव्हाट गल्लीला जाणाऱ्या रस्त्यावरील रेणुका झेरॉक्‍सच्या समोरील प्रांताधिकारी कार्यालयाची भिंत कोसळली.

भेंडीबाजारातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे येथील व्यापाऱ्यांची धांदल उडाली. अनेक रस्त्यांवर पाणी आल्यामुळे दुचाकी व मोटारींभोवती पाणी साचले होते. टेंगिनकेरा गल्लीत झाड कोसळून रस्ता बंद झाल्यामुळे बराच वेळ वाहतूक खोळंबली होती. जुन्या पीबी रोडवरील छत्रपती शिवाजी उड्डाण पुलाच्या खाली अनेक दुकाने आहेत. येथील गटारी तुंबल्यामुळे पाणी दुकानांमध्ये शिरले. एपीएमसी रोडवर ठिकठिकाणी गटारींचे पाणी रस्त्यावर आल्याने त्यातूनच रस्ता काढत वाहनधारक जाताना दिसत होते. बसवाण मंदिराच्या बाजूला जांभळाच्या झाडाची फांदी पडली. यावेळी या फांदीवरील जांभळे अनेकजण पावसातच गोळा करण्यात मग्न झाले होते.

Web Title: Belgaum News Heavy stormy rains in city