येळ्ळूर मरगाळेंच्या पाठीशी, सायनाकांना माघारीचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

येळ्ळूर - नेत्यांनी आत्मभान राखून मराठी जनतेच्या भावनांशी खेळणे बंद करावे, अन्यथा जनताच तुम्हाला धडा शिकवेल. त्यामुळे दक्षिण मतदारसंघातून किरण सायनाक यांनी सीमावासीयांच्या भावनांचा आदर करून उमेदवारी मागे घेऊन अधिकृत उमेदवार प्रकाश मरगाळे यांना पाठिंबा द्यावा, असे जाहीर आवाहन करत मरगाळे यांच्याच पाठीशी थांबण्याचा निर्धार येळ्ळूर विभाग म. ए. समितीने मंगळवारी (ता. २) केला.

समितीचे कार्यकर्त्यांनी सकाळी ९.३० वाजता शांताराम कुगजी यांच्या लाकूड वखारीपासून ते येळ्ळूर वेशीपर्यंत संयुक्‍त महाराष्ट्राच्या घोषणा देत पदयात्रा काढली.

येळ्ळूर वेशीत झालेल्या सभेत तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात आपल्या दाव्याला बळकटी मिळविण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या सूचनेप्रमाणे समितीचे सर्व उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे; परंतु दुर्दैवाने निवडणुकीसाठी समितीचेच दोन-दोन उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे, उमेदवार किरण सायनाक, विनायक जाधव, मोहन बेळगुंदकर, विलास बेळगावकर यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन मध्यवर्तीच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा द्यावा.

जिल्हा पंचायत माजी सदस्य अर्जुन गोरल, ग्रामपंचायत अध्यक्षा अनुसया परीट, दत्ता उघाडे, प्रकाश अष्टेकर, एल. आय. पाटील यांनीही सर्वांनी मध्यवर्तीच्या उमेदवारांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.शांताराम कुगजी, राजू पावले, उदय जाधव, शिवाजी पाटील, वामन पाटील, शिवाजी गोरल, महेश जुवेकर, भैरू भातकांडे, गोपाळ घाडी, सतीश पाटील, दुद्दाप्पा बागेवाडी, अर्चना पठाणी, अजित पाटील, राजू उघाडे, परशराम दणकारे, आनंद मजूकर, युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक आदी उपस्थित होते.

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election