नाल्यात असलेल्या मतिमंद महिलेस वाचविले सफाई कामगारांनी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

शिवाजी उद्यानाजवळील नाल्याची सफाई करण्यासाठी सकाळी महापालिकेचे सफाई कामगार नाल्यात उतरले होते. त्यावेळी विशाल मेक्कळगेरी नामक कामगाराला ती महिला दिसली. कामगारांनी महिलेला नाल्यातून बाहेर काढले. दोन दिवसापूर्वी बेपत्ता झालेली महिला हीच असल्याचे पोलिसांनी सांगितले...

बेळगाव - गेले दोन दिवस नाल्यात असलेल्या एका महिलेला आज (शुक्रवार) सफाई कामगारांनी वाचविले. गीता पत्तार (वय - 48) असे या महिलेचे नाव आहे. जेड गल्ली शहापूर येथील ही महिला मतिमंद असल्याची माहिती कुटूंबीयांकडून मिळाली. गेले दोन दिवस ती बेपत्ता होती. कुटूंबीयांनी ती हरविल्याची तक्रार शहापूर पोलिस ठाण्यात दिली होती.

शिवाजी उद्यानाजवळील नाल्याची सफाई करण्यासाठी सकाळी महापालिकेचे सफाई कामगार नाल्यात उतरले होते. त्यावेळी विशाल मेक्कळगेरी नामक कामगाराला ती महिला दिसली. त्याने आपल्या सहकाऱ्यांना याची माहिती दिली. सचिन देमट्टी, प्रकाश गोरकन्नावर, सिद्राय कांबळे, परशराम मेक्कळगेरी यांनी जावून पाहिले; तर महिला जिवंत असल्याचे दिसले. त्यांनी नगरसेवक विजय भोसले यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. तातडीने पोलिसांनाही तातडीने बोलावून घेण्यात आले. कामगारांनी महिलेला नाल्यातून बाहेर काढले. दोन दिवसापूर्वी बेपत्ता झालेली महिला हीच असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महिलेला उपचारासाठी तातडीने जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. तिच्या कुटुंबातील सदस्यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

Web Title: belgaum news: mentally challenged woman saved