जयंत पाटील यांना इस्लामपूर विकासाशी देणेघेणे नाही - नगराध्यक्ष

धर्मवीर पाटील
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

इस्लामपूर - इस्लामपूरच्या विकासकामांच्या संदर्भात आमदार जयंत पाटील यांनी समोरासमोर येऊन लढण्याची भूमिका घ्यावी, असे आव्हान नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी आज दिले. जयंत पाटील इस्लामपूरचे मतदार नाहीत, त्यामुळे त्यांना इस्लामपूरच्या विकासाशी देणेघेणे नाही, असेही ते म्हणाले.

इस्लामपूर - इस्लामपूरच्या विकासकामांच्या संदर्भात आमदार जयंत पाटील यांनी समोरासमोर येऊन लढण्याची भूमिका घ्यावी, असे आव्हान नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी आज दिले. जयंत पाटील इस्लामपूरचे मतदार नाहीत, त्यामुळे त्यांना इस्लामपूरच्या विकासाशी देणेघेणे नाही, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यादरम्यान झालेल्या सभेतील भाषणावर राष्ट्रवादीने केलेल्या टीकेला निशिकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत प्रत्त्युत्तर दिले.

ते म्हणाले, "जयंतरावांचे समर्थक दादासो पाटील आणि शहाजी पाटील हे पालिकेत असूनही त्यांना वस्तुस्थिती माहीत नाही, हे दुर्दैवी आहे. डिसेंबर २०१६ पासून १२७ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर व काहींना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पैकी ४६ कोटी ३२ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. एकूण ५२ कोटी रुपये बँकांमध्ये आहेत. शहरातील विकासावर, दर्जेवर, नियोजनावर चर्चा होणे अपेक्षित असताना दुर्दैवाने कामे अडवण्यात यांना रस आहे. १५ वर्षे मंत्रिपद असूनही शहराला जोडणारा एकही रस्ता चौपदरी का झाला नाही? भुयारी गटर योजनेवर दोन निवडणूका जिंकून सत्तेत येऊनही ती पूर्ण का केली नाही? जयंत पाटलांच्या मंत्रिपदाचा उपयोग तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला काय झाला? याचे त्यांनी उत्तर द्यावे. संस्था उभारणी आणि चालविण्याचा त्रास त्यांना माहीत नाही. उलट त्यांनी अण्णासाहेब डांगे, नागनाथअण्णा, विलासराव शिंदे यांना त्रास दिला. यापुढे त्यांचे दबावाचे राजकारण चालू देणार नाही."

विविध माध्यमांतून तालुक्याला १४७ कोटींहून अधिक रक्कम सदाभाऊ खोत यांच्यामुळे मिळाली आहे. ५१ कोटी प्रस्तावित आहेत.

- सागर खोत, रयत क्रांती संघटना

'प्रकाश मेडिकल'च्या कर्जात अडथळा.
प्रकाश शिक्षण संस्थेच्या मेडिकल कॉलेजला ज्या बँकेने कर्ज दिले आहे त्यांना नागपुरात भेटून जयंत पाटील यांनी कर्ज देण्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करून नगराध्यक्ष पाटील म्हणाले, "शिक्षण, आरोग्य ही पवित्र क्षेत्रे आहेत. यात राजकारण, कुटनीती, फसवणूक, दबाव आणणे गैर आहे. अन्यथा आरआयटीला आम्हीही पाणी मिळू दिले नसते."

जयंत पाटलांनी सल्लागार बदलावेत!
जयंत पाटील यांच्या दबावाच्या राजकारणाला आता कुणी घाबरणार नाही. कारण आम्ही भोसले आहोत. हलक्या कानाने कुणाचेही काहीही ऐकून मत न मांडता त्यांनी आता सल्लागार बदलावेत, असा टोलाही नगराध्यक्ष पाटील यांनी लगावला.

Web Title: Belgaum News Nishikant Patil press