गलेलठ्ठ पगाराची नोकरी लाथाडून तरूणाचा गाव विकासाचा ध्यास

गलेलठ्ठ पगाराची नोकरी लाथाडून तरूणाचा गाव विकासाचा ध्यास

चिक्‍कोडी - कार्पोरेट विश्‍वाची सर्व सुखे हात जोडून उभी असतानाही जाज्ज्वल्य देशप्रेम आणि समाजाप्रती असलेली तळमळ यासाठी त्याचा त्याग केलाच, शिवाय समाजाला भरीव योगदान देण्यासाठी  त्याने स्वत:च्या मालकीच्या कोट्यवधीचे मूल्य असलेल्या शेतात श्रमदानातून सुसज्ज क्रीडांगण उभे केले. मलिकवाड (ता. चिक्‍कोडी) येथील या उच्चविद्याविभूषित तरुणाची ही ध्येयासक्‍ती आणि त्याग हा नवा अध्याय ठरणार 
आहे. राहुल ऊर्फ आनंद विलासराव देशपांडे असे या ध्येयासक्‍त तरुणाचे नाव आहे. 

सॉफ्टवेअर इंजिनिअरची गलेलठ्ठ पगाराची नोकरी लाथाडून त्यांनी गावात विविध उपक्रम सुरू केले आहेत. स्वत:च्या मालकीच्या एक एकर क्षेत्रात दिवसरात्र श्रमदान करून एक सुसज्ज क्रीडांगण त्यांनी उभे केले आहे. हे क्रीडांगण विजयादशमीच्या मुहूर्तावर शनिवारी लोकार्पण होणार आहे. ३२ वर्षीय राहुल यांचे प्राथमिक शिक्षण मलिकवाड मराठी शाळेत, माध्यमिक शिक्षण चिक्‍कोडी येथील आर. डी. हायस्कूलमध्ये झाले.

धारवाडमध्‍ये बी.ई. इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि कम्युनिकेशनचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर बंगळूर येथे चार वर्षे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केले, पण त्यांचे मन तेथे रमत नव्हते. तेथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आयटी मिल या साप्ताहिक शाखेत ते नियमितपणे जाऊ लागले. देशप्रेम आणि समाजसेवेची प्रेरणा त्यांना तेथेच मिळाली.

दरम्यान, मलिकवाडमध्ये मुलांना व युवकांना खेळण्यासाठी क्रीडांगण नाही. त्यामुळे सक्षम पिढी निर्माण होण्यास अडथळे येत असल्याची बाब त्यांच्या ध्यानात आली. क्षणाचाही विचार न करता त्यांनी आपल्या मालकीची एक एकर जागा गावालगतच क्रीडांगणासाठी उपलब्ध करून दिली. त्यासाठी त्यांचे वडील विलासराव देशपांडे यांनीही प्रोत्साहन दिले. राहुल यांनी श्रमदान करून जमिनीचे सपाटीकरण, कुंपण, संरक्षक भिंत उभी केली. त्यांची ही धडपड गाव मोठ्या उत्सुकतेने पाहत होता. शेवटी एक सुसज्ज क्रीडांगण उभे राहिले. या क्रीडांगणाला त्यांनी शहीद भगतसिंग मैदान असे नाव दिले आहे. 

हे मैदान दिवसभर खेळाडूंनी गजबजून जावे, हीच आपली इच्छा असल्याचे सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्त्वानुसार तरुणांमध्ये देशभक्‍ती रुजावी व तरुण सशक्‍त व्हावेत, यासाठी कबड्डी, व्हॉलीबॉल, कुस्ती, खो-खो असे मैदानी खेळ, योगासन, सूर्यनमस्कार, दंडप्रहार, नि:शस्त्र युद्ध (कराटे), लेदरबॉल क्रिकेट असे उपक्रमही राबविण्यात येत आहेत.

प्रारंभी त्यांनी ती जागा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देऊ केली होती. पण संघाने ही मालमत्ता नाकारून स्थानिक पातळीवरच त्याचा वापर करण्याची सूचना केली. त्यानुसार हे क्रीडांगण उदयास आले. क्रीडांगणाचा वापर इतर सार्वजनिक कामांसाठीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी येथे एक मंचही उभारण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com