
बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानक आवारात असलेले जुने तात्पुरते शेड जमीनदोस्त
बेळगाव : मध्यवर्ती बस स्थानकातील तात्पुरते शेड अखेर जमीनदोस्त केले जात असून येथील जमिनीचे सपाटीकरण करून कॉंक्रिटीकरण केले जाणार आहे. मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अखेरच्या टप्प्यात असून कॉंक्रिटीकरण काम पूर्ण झाल्यानंतर स्थानकाचा शुभारंभ केला जाणार आहे. मध्यवर्ती बस स्थानकाची नूतनीकरण ईमारत आणि प्लॅटफॉर्म परिवहन सेवेसाठी सज्ज झाले आहेत. मात्र अध्याप जुने तात्पुरते शेड हटवून त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट करण्याचे काम शिल्लक असल्याने स्थानकाच्या नूतन इमारतीचा शुभारंभ झालेला नाही. मात्र प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन स्थानकावरील नूतन प्लॅटफॉर्मचा वापर सुरू करण्यात आला आहे. प्रवासी आणि बसेस स्थानकावर प्रवेश करण्यासाठी पै हॉटेल समोरून नवा मार्ग सुरू करण्यात आला आहे.
शहर बसस्थानकाचे (सीबीटी) आणि मध्यवर्ती बस स्थानकाचे काम हाती घेतल्याने २०१६ साली मध्यवर्ती बसस्थानकाच्या शेजारीच तात्पुरते पत्र्याचे शेड उभारून प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले होते. मागील काही वर्षे याच ठिकाणावरून आंतरराज्य, शहर आणि ग्रामीण सेवा दिली जात होती. त्यामुळे याठिकाणी गैरसोयीच अधिक राहिल्या होत्या. सर्व बसेस येथून सुटत असल्याने या आवारात मोठे खड्डे पडून त्या ठिकाणी पावसाळ्यात चिखल आणि डबक्याचे स्वरूप निर्माण झाले होते. मध्यवर्ती बसस्थानक आणि त्याच्या प्लॅटफॉर्मचे काम पूर्णत्वास आले असल्याने तसेच तात्पुरते शेड असलेल्या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेतले जात असल्याने शहर आणि ग्रामीण बससेवा नूतन प्लॅटफॉर्मवरून नुकतीच सुरू करण्यात आली आहे. जुन्या तात्पुरते शेडचा वापर बंद करण्यात येऊन ती जागा आता जमीनदोस्त करण्यात आली आहे.
Web Title: Belgaum Old Temporary Sheds Central Bus Stand Premises Demolished Renovation Central Bus Station Building And Platform Ready Transport Service
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..