बेळगावकरांना आस आता पॅसेंजर रेल्वेची 

सकाळ वृत्तसेवा | Wednesday, 12 August 2020

साडेचार महिने उलटले तरी पॅसेंजर सेवा सुरू न झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे 

बेळगाव : लॉकडाउनमुळे २२ मार्चपासून बंद असलेली एक्‍स्प्रेस रेल्वेसेवा सुमारे दोन महिन्यानंतर सुरु झाली. मात्र, साडेचार महिने उलटले तरी पॅसेंजर सेवा सुरू न झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी पॅसेंजर सेवा तातडीने सुरु करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

कोरोनामुळे देशभरातील रेल्वेसेवा सुमारे दोन महिने पूर्णपणे बंद होती. लॉकडाउन मागे घेतल्यानंतर योग्य ती खबरदारी घेऊन २०० एक्‍सप्रेस रेल्वे सुरु केल्या. पण, ही सेवा सुरु करुन दोन महिने उलटले तरी प्रवाशांचा म्हणावा तितका प्रतिसाद नाही. त्यामुळे रेल्वेला तोटाही सहन करावा लागत आहे. राज्यात मोजक्‍याच गाड्या धावत आहेत. राज्यभरात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पॅसेंजर रेल्वे सुरु करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा सध्या कोणताही विचार नाही. 

हेही वाचा - महापुरात पडलेलं घर 95 हजारात घर बांधता येतं का ?

कोरोना नियंत्रणात आल्यास आणि राज्य सरकारने मागणी केल्यास पॅसेंजर रेल्वे सुरु होऊ शकणार आहे. लॉकडाउन शिथील केल्यानंतर ४ मे पासून बेळगाव शहरातील सर्व व्यवहार हळूहळू सुरळीत झाले. बेळगाव शहरात येण्यासाठी रायबाग, कुडची, लोंढा आदी भागातील प्रवासी पॅसेंजर रेल्वेचा आधार घेतात.

मात्र, गेल्या साडेचार महिन्यांपासून पॅसेंजर रेल्वे बंद असल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. अनेकांना खासगी वाहनांचा आधार घेऊन बेळगावात कामावर यावे लागत आहे. सध्या सुरु असलेल्या एक्‍स्प्रेस रेल्वे खबरदारी घेऊन सुरु केल्या आहेत. मास्क असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जात आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचेही पालन केले जात आहे. अशीच खबरदारी घेऊन पॅसेंजर रेल्वे सुरु करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच असल्यामुळे खबरदारी घेतली आहे. सध्या एक्‍स्प्रेस रेल्वे सुरू आहेत. कोरोनामुळे प्रवाशांचाही प्रतिसाद कमी आहे. कोरोना कमी झाल्यास तसेच राज्य सरकारने पॅसेंजर रेल्वे सुरु करण्यासाठी मागणी केली तर विचार करण्यात येईल.

हेही वाचा -  झुलेलाल चौक गतवर्षी महापुरात, आज कोरडा ठाक...

- सुरेश अंगडी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री

लॉकडाउनमुळे पॅसेंजर रेल्वे पूर्णपणे बंदच आहे. यामुळे कुडची भागातून बेळगावला जाणाऱ्या प्रवाशांना अडचणी होत आहेत. खबरदारी घेऊन पॅसेंजर रेल्वे सुरु केल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.

- इकबाल कोले, सदस्य, रेल्वे प्रवासी सुधारणा समिती

संपादन - स्नेहल कदम