बेळगाव : सीमाभागातील संमेलनांमध्ये सीमाप्रश्‍न ठरावाचा विसर 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 January 2021

सीमाभागात दरवर्षी नोव्हेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत मराठी साहित्य संमेलने होतात

बेळगाव - दरवर्षी सीमाभागात होणाऱ्या 12 संमेलनांचे मुख्य आकर्षण सीमाप्रश्‍नाचा ठराव असतो. मात्र, सीमाभागात आतापर्यंत यंदा झालेल्या तिन्हीही संमेलन आयोजकांनी सीमाप्रश्‍नाच्या ठरावाचा विसर पडलेला असल्यामुळे सीमावासीयांतून नाराजी दिसून येत आहे. सीमाभागात अजून 9 संमेलने पार पडणार आहेत. त्या संमेलन आयोजकांनी तरी सीमाप्रश्‍नाचा ठराव मांडावा, अशी मागणीही होत आहे. 

सीमाभागात दरवर्षी नोव्हेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत मराठी साहित्य संमेलने होतात. गतवर्षी मार्च महिन्यांपासून जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्व कार्यक्रमांवर मर्यादा आल्या. संमेलन आयोजकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संमेलनाला परवनागी मागितल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनीही परवानगी दिली. आयोजकांनी खबरदारी म्हणून दरवर्षी उत्त्साहात होणाऱ्या संमेलनाचे स्वरुप अगदी छोटे केले. तरी देखील रसिकांचा उत्फूर्त प्रतिसाद संमेलनांना मिळत आहे. 

दरवर्षी चार ते पाच सत्रात सकाळी 9.30 ते 5 वाजेपर्यंत साहित्य संमेलने भरविली जात होती. मात्र, यंदा कोरोनामुळे फक्त दोन ते तीन सत्रात सकाळी 9.30 ते दुपारी 2 पर्यंत संमेलने भरविली जात आहेत. सीमाभागात नोव्हेंबरमध्ये खानापूर तालुक्‍यातील माचीगडचे संमेलन पार पडले. त्यानंतर 10 जानेवारीला कडोली व 24 रोजी उचगाव येथील संमेलन झाले. मात्र, या तिन्ही संमेलनांत सीमाप्रश्‍नाचा ठराव मांडण्यात आला नाही. सीमाभागात अजून कुद्रेमानीचे संमेलन 31 रोजी होणार आहे. तसेच सांबरा, येळ्ळूर, बेळगुंदी, निलजी, गुंफन, कारदगा, मंथन, साठे प्रबोधिनी ही नऊ संमेलने पार पडणार आहेत. यातील काही संमेलनांत सीमाप्रश्‍नाचा ठराव मांडला जात नाही. मात्र, सर्वोच्च न्यालायातील सीमाप्रश्‍नातील दाव्याला बळकटी मिळावी, यासाठी त्या संमेलन आयोजकांनीही यंदापासून सीमाप्रश्‍नाचा ठराव मांडावा, अशी मागणी सीमावासीयांतून केली जात आहे. 

हे पण वाचा कंपनी कामगारांचे १७ कोटी देईना; मग कर्मचाऱ्यांनी असं काय केलं की, पाहून सर्वच जण झाले आवाक्

 

 संमेलनात मांडण्यात येणारे ठराव 
-सीमाप्रश्‍न लवकर सुटावा यासाठी केंद्राने प्रयत्न करावेत. 
-सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करावा. 
-मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा 
-सीमावासीयांना कर्नाटक सरकारने सर्व कागदपत्रे मराठीत द्यावीत 
-सीमाभागात मराठी भाषा व संस्कृतीचे जतन व्हावे 
 
दरवर्षीप्रमाणे यंदाही साहित्य संमेलनात सीमाप्रश्‍नी ठराव मांडण्यास कोणतीही हरकत नाही. जी सत्यस्थिती आहे, ती ठरावाच्या माध्यमातून मांडावी. यंदा काही संमेलनांत जरी ठराव मांडण्यात आला नसला तरी यानंतर होणाऱ्या संमेलन आयोजकांना सांगून ठराव मांडण्यासंबंधी चर्चा करण्यात येईल. 
-ऍड. नागेश सातेरी, अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन महासंघ-सीमाभाग 
 
संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: belgaum sahitya sammelana 2021