
बेळगाव : सोमवारपासून शाळा गजबजणार
बेळगाव : नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे शिक्षण खात्यासह विद्यार्थ्यांची लगबग वाढली आहे. शिक्षण खात्याने पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्याची सूचना केली आहे.१६ मे पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. त्यामुळे शनिवारी व रविवारी शाळांमध्ये स्वच्छता करण्यात येणार आहे. शिक्षकांना शाळेत हजर होऊन सर्व कामे पूर्ण करण्याची सूचना केली आहे. तसेच शाळा सुरू होण्यापूर्वी पालकांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना कराव्यात, असेही कळविले आहे. पालक व विद्यार्थी आवश्यक त्या साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी करू लागले आहेत. वह्या, दप्तर आदी साहित्य खरेदी करण्यासाठी दोन दिवस गर्दी होण्याची शक्यता आहे.
दरवर्षी मेअखेरीस शैक्षणिक वर्षाला सुरुवात होते. मात्र यावेळी १५ दिवस अगोदर शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे शाळांत लवकर किलबिलाट होणार आहे. काही राज्यांनी लवकर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे केंद्रानेही राज्यांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. त्याचेही शिक्षण खात्याला पालन करावे लागणार आहे. राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढला असला तरी उष्णतेचा कोणताही त्रास विद्यार्थ्यांना होणार नाही, असे मत शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी व्यक्त केले आहे.
काही राज्यांनी या वर्षी लवकर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावेळी लवकर शाळा सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये, याकरिता सुरुवातीचे काही दिवस विद्यार्थ्यांना गणवेशाची सक्ती करू नये, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. विद्यार्थ्यांना अनुकूल कपडे परिधान करण्याची मुभा द्यावी.
‘बुक बँके’चा आधार
शाळा लवकर सुरू होणार असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिक्षण खात्यातर्फे पुस्तकांचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र अद्याप काही पुस्तकांचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर ‘बुक बँके’चा आधार घेऊन काही पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जातील. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस शिक्षण खात्याला ‘बुक बँके’चा आधार घ्यावा लागणार आहे.
Web Title: Belgaum Schools Be Full From Monday
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..