बेळगाव : बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल

बेळगाव : बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल

बेळगाव : साडेतीन मुहुर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर सोने-चांदीच्या पेढीसह, दुचाकी व चारचाकी वाहने खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दर मंगळवारी बेळगावची बाजारपेठ बंद ठेवली जाते. मात्र, अक्षय्य तृतीयेनिमित्त बहुतेक व्यावसायिकांनी दुकाने सुरू ठेवली होती. या मुहुर्तावर बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल झाली.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर सोने, चांदी खरेदीला प्राधान्य दिले जाते. यासाठी सराफ व्यावसायिक सज्ज झाले होते. मंगळवारी (ता. ३) सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम ५३,२०० रुपये होता. दोन हजार रुपयांनी हा दर कमी झाल्यामुळे खरेदीला नागरिकांचा प्रतिसाद लाभला. गेल्या आठवड्याभरात बेळगावच्या बाजारपेठेत सुमारे १०० कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती मिळाली. तसेच बेळगाव शहरातील दुचाकी व चारचाकी वाहनांच्या शोरुममध्येही वाहन खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. या क्षेत्रातही कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती शोरुमच्या संचालकांनी दिली. गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून वाहने बुकींगही करण्यात आली होती. या शुभमुहुर्तावर बेळगाव शहरात सुमारे अडीच हजार दुचाकी व ६०० ते ७०० चारचाकी वाहनांची खरेदी झाली. लग्नसराई व अक्षय्य तृतीया असल्यामुळे फर्निचरलाही मागणी होती. तसेच फ्लॅटची खरेदीही मोठी झाली. इलेक्ट्रीक व इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचीही खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. या पार्श्‍वभूमीवर मोबाईल दुकानात गर्दी पाहायला मिळाली. टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन व अन्य साहित्यांचीही खरेदी झाली.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तानिमित्त खरेदीसाठी बेळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत मंगळवारी मोठी गर्दी होती. सलग बँका बंद असल्याने ऑनलाईन व्यवहार अधिक झाले. बेळगाव शहरात गेल्या आठवडाभरात अक्षय्य तृतीयेनिमित्त सुमारे १०० कोटींची उलाढाल झाली. सध्या सोनेदरात दोन हजार रुपयांनी घसरण झाली.

- अनिल पोतदार, सुवर्णकार

यंदा दुचाकी व चारचाकी वाहनांचे बुकींग मोठ्या प्रमाणात झाले आहे. गाड्यांची कमतरता भासत आहे. तरीही बेळगाव शहरात अडीच हजार दुचाकी व ६०० ते ७०० चारचाकी वाहनांची विक्री झाली. यातून कोट्यवधींची उलाढाल झाली. कंपनीकडे प्रोडक्शन कमी असल्यामुळे अडचणी आल्या.

- शैलेश खटावकर, माणिकबाग सुझुकी

Web Title: Belgaum Turnover Crores Market

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top