बेळगाव : रेल्वे गेट येथील चौथ्या उड्डाण पुलाचे काम जानेवारीपर्यंत पूर्ण होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगाव : रेल्वे गेट येथील चौथ्या उड्डाण पुलाचे काम जानेवारीपर्यंत पूर्ण होणार

बेळगाव : रेल्वे गेट येथील चौथ्या उड्डाण पुलाचे काम जानेवारीपर्यंत पूर्ण होणार

sakal_logo
By
सकाळ वृतसेवा

बेळगाव : कोरोनामुळे काम पूर्ण होण्यास अधिक प्रमाणात विलंब झालेल्या तिसऱ्या रेल्वे गेट येथील उड्डाण पुलाचे काम वेगाने हाती घेण्यात आले असून जानेवारी महिन्यापर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्याची सूचना क्रिशी इन्फोटेकला करण्यात आली आहे.

गोगटे सर्कल येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर तिसरे रेल्वे गेट येथे शहरातील चौथ्या उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले होते. तसेच तत्कालीन खासदार कै. सुरेश अंगडी यांच्या हस्ते ६ जून २०१९ रोजी कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. तसेच मार्च २०२० पर्यंत काम पूर्ण केले जाणार होते. मात्र सुरुवातीपासूनच येथील कामाचा वेग संत असल्याने पहिल्या तीन-चार महिन्यात फक्त खोदाई करण्याचे काम हाती घेण्यात आले होते तर त्यानंतर सर्वत्र कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने येथील काम अनेक महिने बंद होते.

चौथ्या उड्डाणपुलाच्या कामासाठी २७ कोटी २८ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. तसेच या उड्डाणपुलासाठी दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात गर्डर बसविण्यात येणार असल्याने जुन्या धारवाड रोड नंतरचा शहरातील सर्वात मोठा उड्डाणपूल म्हणून या पुलाची ओळख बनणार आहे. मात्र कामाला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने या उड्डाणपुलाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून पुलाचे काम पूर्ण होई तो पर्यंत खर्च ४० कोटींच्या घरात जाईल असे मत व्यक्त केले जात आहे.

कामाला मोठ्याप्रमाणात विलंब झाल्याने नागरिकांना अनेक महिने तिसरे रेल्वे गेट परिसरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम वेळेत पूर्ण होणे गरजेचे असून काही दिवसांपूर्वी विविध संघटनांनी खासदार मंगला अंगडी रेल्वे खात्याच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन काम वेळेत पूर्ण करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पुलाचे काम वेगाने हाती घेण्यात आले असून गर्डर बसवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता दोन्ही बाजूला माती टाकून रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी काम हाती घेण्यात आले असून येत्या दोन महिन्यात पुलासाठी आवश्यक असलेल्या सर्व कामांची पूर्तता करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या ज्या प्रकारे काम हाती घेण्यात आले आहे. त्याच प्रकारे पुढील दिवसात ही वेगाने काम हाती घेऊन काम लवकर पूर्ण करून या भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडावी असे मत वाहन चालकांमधून व्यक्त होत आहे.

हेही वाचा: झी न्यूज आणि टाइम्स नाऊवर कारवाई; चुकीच्या आणि एकांगी वार्तांकनावर ठपका

"कामाला अधिक विलंब होऊ नये यासाठी जानेवारीपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कोरोनामुळे काम पूर्ण होण्यास विलंब झाला होता. मात्र सर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे वेळेत काम पूर्ण होईल"

: अनिश हेगडे, जण संपर्क अधिकारी रेल्वे

loading image
go to top