चित्री लाभक्षेत्र वाढवण्याच्या हालचाली 

चित्री लाभक्षेत्र वाढवण्याच्या हालचाली 

गडहिंग्लज - आजरा तालुक्‍यातील चित्री मध्यम प्रकल्पाचे लाभक्षेत्र सध्या हिरण्यकेशी नदीवरील निलजी (ता. गडहिंग्लज) बंधाऱ्यापर्यंत आहे. आता हेच लाभक्षेत्र खणदाळ बंधाऱ्यापर्यंत वाढविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया पाटबंधारे विभागाच्या पुढाकाराने सुरू आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षापासूनची पूर्व भागातील जनतेच्या मागणीला शाश्‍वत स्वरूप येत असल्याचे संकेत मिळत आहेत. 

चित्रीमध्ये 2001 पासून पाणीसाठा सुरू झाला आहे. 1856 एमसीएफटी क्षमतेच्या पाणीसाठ्याचा हा प्रकल्प आजरा व गडहिंग्लज तालुक्‍यातील गावांना वरदान ठरला आहे. प्रकल्प अहवालानुसार या प्रकल्पातील पाण्यावर 5 हजार 850 हेक्‍टर क्षेत्र ओलीताखाली असली तरी प्रत्यक्षात साडेसहा हजार हेक्‍टरवर क्षेत्र भिजत असल्याचे सांगण्यात येते.

निलजी बंधाऱ्यापर्यंतच या प्रकल्पाचे लाभक्षेत्र असल्याने त्याखालील तालुक्‍यातील अनेक गावे हक्काच्या पाण्यापासून वंचित राहिले आहेत. हिटणी, मुत्नाळ, खणदाळ, बसर्गे, हलकर्णी, चंदनकूड, अरळगुंडी, कडलगे, इदरगुच्ची, नांगनूर या गावांना हक्काचे पाणी मिळत नाही. पाटबंधारे खाते माणुसकीच्या दृष्टीकोनातून लाभक्षेत्रापलिकडेही पाणी सोडते. परंतु या गावातील शेतीला लाभक्षेत्रापेक्षा कमी पाणी मिळते.

उपसा कालावधीही दहा दिवसांचा आहे. तरीसुद्धा सोडलेले पाणीही अवघ्या पाच-सहा दिवसातच संपते. यामुळे खणदाळ बंधाऱ्यावरील सात गावच्या पाणी योजनांचे जॅकवेल कोरडे पडतात. परिणामी वीसहून अधिक दिवस या गावांना पिण्याचे पाणी नळाला मिळत नाही. 

या साऱ्याचा विचार करून आता पाटबंधारे विभागच लाभक्षेत्र वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या विचाराधीन आहे. निलजीनंतरच्या खणदाळ बंधाऱ्यापर्यंत हे लाभक्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी पाटबंधारे विभाग प्रस्तावही तयार करणार आहे. या बंधाऱ्यातील पाणीसाठा, कृषी पंपांची एकूण अश्‍वशक्ती आणि ओलीताखाली येणारे क्षेत्र यासंदर्भातील माहिती संकलीत करण्याचे काम सुरू झाले आहे.

हा प्रस्ताव मंजूर झाल्यास पूर्वभागातील गावांना दिलासा मिळणार आहे. त्यांना हक्काचे पाणी मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. परंतु हा प्रस्ताव वरिष्ठांच्या किती पचनी पडतो, यावरही त्याचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि जनतेचा दबाव असल्यास प्रस्तावाला गती मिळेल, यात शंका नाही. 
 
पीक आराखडा बदलणार 
मुळात चित्री धरणातील पाणी साठ्याच्या क्षमतेनुसार लाभक्षेत्रातील पीक आराखडा तयार केला आहे. आता लाभक्षेत्र वाढवायचे झाल्यास पीक आराखडाही बदलावा लागणार आहे. मुळात उपलब्ध पाण्यापेक्षा कितीतरी पटीने ऊस क्षेत्र वाढले आहे. आता खणदाळपर्यंत लाभक्षेत्र वाढविले तरी मूळ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठीच्या पाण्यात कपात होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. ही कसरत पाटबंधारे विभागाकडून कशी केली जाते हेही महत्वाचे ठरणार आहे. 
 
कालव्याप्रमाणे "लॉस' नाही 
प्रकल्पाला कुठेच कालवा नाही. उदाहरणच द्यायचे झाल्यास, कालव्याने पाणी दिल्याने 10 एमसीएफटीमागे 100 हेक्‍टर क्षेत्र भिजत असेल तर इतक्‍याच पाण्याचे नदीतून उपसा केल्यास 150 हेक्‍टर क्षेत्र भिजते. चित्रीचे पाणी नदीत सोडल्यानंतर पंपाद्वारे पाण्याचा उपसा होतो. यामुळे पाण्याचा लॉस नगण्य आहे. म्हणूनच चित्री लाभक्षेत्रात वाढीव क्षेत्रालाही पाणी मिळत आहे. तेही आता अगदी काठावर आहे. परंतु, सध्यापेक्षा अधिक क्षेत्र वाढल्यास पाणी कमी पडण्याची शक्‍यता वर्तविण्यात येते. 

खणदाळ बंधाऱ्यापर्यत चित्रीचे लाभक्षेत्र वाढवण्याच्या विचारात आहे. प्रस्ताव तयार करण्यासाठी आवश्‍यक माहितीचे संकलन सुरू आहे. लवकरच प्रस्ताव करून तो वरिष्ठांकडे पाठवणार आहे. 
- सुहास नाडकर्णी,
उपअभियंता पाटबंधारे विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com