
साडेचार लाखांचे सोने घेऊन पसार झालेल्या पश्चिम बंगाल येथील गलाई कारागिराला आज पहाटेच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
सांगली : साडेचार लाखांचे सोने घेऊन पसार झालेल्या पश्चिम बंगाल येथील गलाई कारागिराला आज पहाटेच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका रात्रीत गुन्ह्याचा छडा लागला.
तरुण दयाल मोदी (वय 20, रा. पश्चिम मिदनापूर, ता. घाटाल, पश्चिम बंगाल) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून सारा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपाधीक्षक अजित टिके, शहरचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणी प्रशांत अनिल जाना (36, गावभाग, खिलारे वाडा, मूळ रा. किस्मत, ता. घाटाल) यांनी फिर्याद दिली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत जाना यांच्या सराफी दुकानात तरुण मोदी हा कारागीर म्हणून वर्षभरापासून काम करत होता. जाना यांनी त्याच्याकडे 102 ग्रॅम सोने दिले होते. काल रात्री साडेनऊच्या सुमारास हे सोने घेऊन तरुण मोदी हा पसार झाला. त्याचा मोबाईल बंद होता. त्यानंतर जाना यांनी तातडीने शहर पोलिसांत धाव घेतली.
पोलिस निरीक्षक सिंदकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक निरीक्षक निलेश बागाव, दिलीप जाधव, संदीप पाटील, विक्रम खोत, अक्षय कांबळे यांना संशयिताचा शोध घेण्याचे आदेश दिले. पोलिस पथकाने त्याचे शेवटचे मोबाईल लोकेशन शोधले असता, ते सांगली रेल्वे स्थानकावर दाखवत होते.
पथकाने सांगली रेल्वे स्थानकावर धाव घेतली. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गोवा निजामुद्दीन एक्सप्रेस सुटल्याची माहिती मिळाली. याच रेल्वेने संशयिताने पलायन केले असावे, असा अंदाज घेत पथकाने पुणे, अहमदनगर, दौंड रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून चोरट्याची माहिती दिली. पहाटे साडेचारच्या सुमारास रेल्वे पुणे स्थानकावर आली.
तेथे उतरून तरुण रेल्वे स्थानकावरील वेटिंग रुममध्ये बसला होता. त्याच्याकडे दिल्लीचे तिकीट मिळाले. आरसीएफचे निरीक्षक अश्वनीकुमार, फौजदार रेड्डी, कवडे यांनी चोरट्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले. सकाळी नऊ वाजता सांगली पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पाच तासांत चोरटा जेरबंद झाला.
संपादन : युवराज यादव