‘बेनझीर व्हीला’चा होणार कायापालट

राधानगरी धरण जलायशयातील बेटावर असलेल्या संस्थानकालीन ऐतिहासिक ‘बेनझीर व्हीला’
राधानगरी धरण जलायशयातील बेटावर असलेल्या संस्थानकालीन ऐतिहासिक ‘बेनझीर व्हीला’

राधानगरी - राधानगरी धरण जलायशयातील बेटावर असलेल्या संस्थानकालीन ऐतिहासिक ‘बेनझीर व्हीला’ वास्तूच्या कायापालटाची योजना लवकरच आकाराला येणार आहे. या वास्तूचे संवर्धन, संरक्षण व नूतनीकरणाची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या निर्देशानुसार जलसंपदा विभागाने प्रस्तावित योजनेचा आराखडा व अंदाजपत्रकाची कार्यवाही सुरू केली आहे. यासह हत्तीमहालचाही कायापालट होणार आहे.

प्रस्तावित योजनेत जलाशयातून वास्तूपर्यंत जाण्यासाठी बोटिंग सुविधा असेल. वास्तू वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळ बनणार आहे. वास्तूभोवताली संरक्षण भिंत, वास्तू ज्या भूखंडावर आहे त्या टेकडीच्या पायथ्यापासून वास्तूपर्यंत ये-जा करण्यासाठी पायऱ्यांची सुविधा करण्यात येणार आहे. मूळ ढाचा कायम ठेवून दुरवस्था झालेल्या या वास्तूचा प्रस्तावित योजनेतून जीर्णोद्धार होणार आहे. वास्तूपर्यंत जलवाहतुकीसाठी राऊतवाडीजवळ धरण जलाशयालगत जेटीची उभारणीही होणार आहे.

जलसंपदा विभागाने राधानगरीच्या पर्यटन विकासाला साह्यभूत ठरण्याचा आणखी दोन योजना प्रस्तावित केल्या आहेत. यात हत्तीमहाल या ऐतिहासिक वास्तूची विशेष दुरुस्ती करण्यात येणार आहे, तर हत्तीमहाल येथील जलसंपदा विभागाच्या कर्मचारी वसाहतीमधील विनावापर निवासस्थानांचीही विशेष दुरुस्ती होणार आहे. ही निवासस्थाने सर्वसोयींनीयुक्त करून त्याचा वापर पर्यटकांच्या निवास व्यवस्थेसाठी करण्यात येणार आहे. 

‘सकाळ’चे यश
मे महिन्यामध्ये दाजीपूर अभयारण्याच्या स्वच्छतेची मोहीम ‘सकाळ’तर्फे घेतली. याला भरभरून प्रतिसाद मिळाला. त्याच वेळी या वास्तूंविषयीचा विषय ‘सकाळ’ने उचलून धरला होता. बायसन व स्थानिकांनीही स्वच्छता केली. त्याची दखल घेऊन शासनाने हे पाऊल उचलले आहे. ‘सकाळ’च्या मोहिमेचे हे यश आहे.

बेनगिरी (बेनझीर) व्हीलाच्या नूतनीकरणाचा व अनुषंगिक कामाचा आराखडा व अंदाजपत्रक लवकरच तयार होईल. प्रस्ताव मंजुरी व आर्थिक तरतुदीसाठी जिल्हा नियोजन व विकास महामंडळाकडे सादर करण्यात येईल. प्रस्ताविक योजनेसाठी एक कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
- आर. डी. पाटील, शाखा अभियंता जलसंपदा विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com