पोलिस निवडणुकीत व्यस्त, गल्लीबोळात आयपीएलवर सट्टा! 

Betting on IPL matches in Solapur is going on
Betting on IPL matches in Solapur is going on

सोलापूर : एकीकडे सर्वच पोलिस यंत्रणा लोकसभा निवडणुकीत व्यस्त असून दुसरीकडे आयपीएल क्रिकेट सामन्यांवर गल्लीबोळात सट्टा जोरात सुरू आहे. शहर आणि परिसरातील महाविद्यालयीन तरुणाई आयपीएलवर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळत असल्याचे समोर आले आहे. यातून गुन्हेगारीविषयक घटनांना प्रोत्साहन मिळत असल्याचे चित्र आहे. 

सोलापुरात नई जिंदगी, कल्याणनगर, जुळे सोलापूर, सैफुल, रामवाडी, बाळे, शेळगी आदी ठिकाणी आयपीएल क्रिकेट सामान्यांवर सट्टा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी एका मोठ्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याने आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावून तब्बल 70 हजार रुपये मिळविले. महागडा मोबाईल आणि मित्रांसोबत पार्टीचे प्लॅनिंग करतानाच एवढी मोठी रक्कम ठेवायची कुठे हा प्रश्‍न त्या तरुणाला पडला. हा प्रकार त्याच्या वडिलांना कळाला. मित्रांच्या संगतीमुळे वाईट मार्गाला लागलेल्या मुलाला वडिलांनी चांगलाच बदडला. महागड्या वस्तू आणि पार्टीसाठी पैसे जमविण्यासाठी अनेक तरुण आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावत असल्याचे चित्र आहे. शहर आणि परिसरात आयपीएलवर सट्टा सुरू असून त्यावर काय कारवाई करणार? असे विचारल्यानंतर मोठी कारवाई होईल असे ठिकाण सांगा कारवाई करण्यात येईल असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

पैशांची आशा निर्माण होऊन मुले त्यात अडकतात. सट्ट्याच्या आहारी गेल्याने माझ्या परिचयातील एका व्यक्तीचे 10 लाखांचे नुकसान झाले. आयपीएल क्रिकेट हे मनोरंजन म्हणून पाहिले पाहिजे. सध्या आयपीएल हा प्रकार पन्नास टक्के सट्ट्याने व्यापला आहे. पूर्ण मॅच, एका ओव्हरसाठी पैसे लावले जात आहे, असे शेळगी परिसरात राहणारे व्यापारी महालिंग दुलंगे यांनी सांगितले. 

सट्ट्याचे व्यसन लागल्यानंतर नैराश्‍य, व्यसनाधीनता, निद्रानाश, आत्महत्यासारखे गंभीर मानसिक धोके संभवतात. सट्ट्यामध्ये सतत पैसे हरल्यामुळे अनेकजण स्वत:ला दोषी ठरवून निराश होऊन जीवन जगत राहतात, असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नितीन भोगे यांनी सांगितले. 

वाईट संगतीमुळे मुले बिघडतात. आयपीएल क्रिकेट सामन्यांवेळी मुलांच्या ग्रुपमध्ये सट्ट्याची चर्चा चालू असते. त्यावर पालकांनी लक्ष ठेवायला हवे. मुलांना क्रिकेटची किती आवड आहे, त्या विषयावर ते मोबाईलवरून कोणाशी बोलत आहेत का? असे पाहावे. तसेच त्यांच्या मोबाईलमधील संशयित नंबरची चौकशी करावी. 
- महालिंग दुलंगे, पालक 


सट्ट्यामुळे गुन्हेगारी वृत्ती वाढत असून पैशाच्या हव्यासापोटी विद्यार्थ्यांवर मानसिक परिणाम होत आहे. सट्टा नाही लागला तर मुले स्वत:च्या नशिबाला दोष देतात, याच्यामुळे मेंदूमध्ये केमिकल बदल होतात आणि हळूहळू व्यसन लागत जाते. मुलांना सट्टा किंवा अन्य व्यसन लागले असेल तर पालकांनी वेळीच मानसोपचार तज्ज्ञाकडे न्यावे. 
- डॉ. नितीन भोगे, मानसोपचार तज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com