दोन्ही कॉंग्रेसची सावध भूमिका 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता स्थापनेबाबत सावध भूमिका घेतली आहे. आपली भूमिका उघड न करता फोनवरूनच राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी कॉंग्रेसचे नेते जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील यांनी चर्चेला सुरवात केली आहे. दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांना मात्र सत्ता आपलीच येईल अशी खात्री वाटत आहे. 

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता स्थापनेबाबत सावध भूमिका घेतली आहे. आपली भूमिका उघड न करता फोनवरूनच राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी कॉंग्रेसचे नेते जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील यांनी चर्चेला सुरवात केली आहे. दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांना मात्र सत्ता आपलीच येईल अशी खात्री वाटत आहे. 

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला 14, तर राष्ट्रवादीला 11 जागा मिळाल्या आहेत. एक अपक्ष व भुदरगड तालुक्‍यातील आघाडीचे दोन असे तीन सदस्य त्यांच्यासोबत असतील; पण बहुमतासाठी आवश्‍यक 34 चा आकडा पार करायला अजूनही सहा सदस्यांची गरज आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना मावळत्या सभागृहात कॉंग्रेससोबत असली तरी यापुढे त्यांची भूमिका माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यावर अवलंबून आहे. "स्वाभिमानी' कॉंग्रेससोबत आली तरी चार सदस्य कमीच पडतात. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या आघाडीचे दोन सदस्य आहेत; पण ते लगेच कॉंग्रेससोबत जातील का नाही याविषयी संभ्रम आहे. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांनी सत्ता स्थापनेबाबत साधव हालचाली सुरू केल्या आहेत. 

दुसरीकडे भाजप व शिवसेनेचे राज्यातील भांडण मिटले तर मात्र दोन्ही कॉंग्रेसला सत्ता मिळणे अशक्‍य आहे. हा निर्णय व्हायला अजून काही दिवसांचा अवधी जाईल. तत्पूर्वी मुश्रीफ यांनी आज पी. एन. पाटील, सतेज पाटील यांच्याशी दूरध्वनीवरूनच चर्चा केली. चर्चेचा तपशील सांगितला नाही; पण "आमचं जमलं' एवढीच प्रतिक्रिया या नेत्यांनी दिली. कसे जमले? या प्रश्‍नावरही त्यांनी "जमल्यावर सांगतो' एवढेच उत्तर दिले. 

जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच असेल असा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. शिवसेनेशी राज्यपातळीवर मिटले, तर हे शक्‍य आहे. शिवसेनेचे 10 व भाजपचे 14 मिळून 24 सदस्य होतात. "जनसुराज्य' शक्तीचे सहा, ताराराणी आघाडीचे 3 सदस्यही या आघाडीत असतील. त्यामुळे हे संख्याबळ 33 वर पोचते. बहुमतासाठी आवश्‍यक 34 चे संख्याबळ पूर्ण करण्यात युतीला फारशी अडचण येणार नाही; पण यासाठी मुंबईत सेना-भाजपचा निर्णय काय होणार याची प्रतीक्षा करावी लागेल. 

चर्चा सुरू आहे- पी. एन. 
राष्ट्रवादीच्या नेत्यांशी सत्ता स्थापनेबाबत चर्चा सुरू आहे. एक-दोन दिवसांत त्याला मूर्त स्वरूप येईल. त्यानंतर कॉंग्रेसच्या सदस्यांसह नेत्यांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, आताच आम्ही आमचे पत्ते खुले करणार नाही, असे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी "सकाळ'ला सांगितले. 

Web Title: Beware of the role of the Both Congress