जिद्दीने बनविले मुलीला जलतरणपटू

राजू पाटील
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

हमाली करणाऱ्या वडिलांनी आपल्या मुलीला जलपरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगले असून त्या बाप-लेकींच्या या धडपडीची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली असून ‘बेटी बचाव’ यासाठी त्यांचा माहितीपट प्रेरणा ठरणार आहे.

राशिवडे बुद्रुक - वंशाला दिवा हवा म्हणून अट्टाहास होत असताना ‘वारस पेक्षा सरस’ असलेली ‘मुलगी’च कशी श्रेष्ठ ठरते, हे येथील हमाली करणाऱ्या वडिलांनी दाखवून दिले आहे. त्यांनी आपल्या मुलीला जलपरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगले असून त्या बाप-लेकींच्या या धडपडीची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली असून ‘बेटी बचाव’ यासाठी त्यांचा माहितीपट प्रेरणा ठरणार आहे. लवकरच भक्ती आणि राहुल वाडकर यांच्या जिद्दीची कथा लोकांपर्यंत पोचणार आहे. राज्य शासनाची ही फिल्म मुलींचे महत्त्‍व अधोरेखीत करणार आहे. 

राधानगरीच्या शासकीय गोदामात हमाली करणारे राहुल वाडकर, चांगले पट्टीचे पोहणारे असूनही प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना स्विमर होता आले नाही. अशा स्थितीतही त्यांनी आपले स्वप्न आपल्याच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. प्रसंगी आपल्या पोटाला चिमटा बसला तरी बेहत्तर पण मुलीला जलपरी करण्याची त्यांची जिद्द प्रेरणादाई आहे. 

विवाहानंतर राहुल आणि गीता या दाम्पत्याला पहिली मुलगी झाली, तीही महाशिवरात्रीच्या भर अमावस्येला. मात्र कशाचीच तमा न बाळगता या बापाने मुलीला पोटीशी धरले आणि तिच्या इवल्याशा डोळ्यात उद्याची स्विमर पाहिली. बारशाच्या दिवशीच राहुलनी चिमुरडीला घराशेजारच्या गावतलावात बुडवून तिला चार हात मारायला भाग पाडले. ते मारलेले हात आजही थांबलेले नाहीत. भक्ती ऊर्फ जिजाऊ आज तेराव्या वर्षीच पट्टीची पोहणारी झाली आहे. आजोबा मारुती आणि आजी विमल यांनीही राहुलच्या धडपडीला साथ केली आहे. गाव किंवा परिसरात कुठेही जलतरण तलाव नसला तरी गावाच्या तळ्यात तिला पाण्यावर स्वार व्हायला शिकवले.

शालेय जलतरण स्पर्धेत तिने बाराव्या वर्षी सहभाग घेतला आज आठवीच्या वर्गात शिकत ती राज्य पातळीवर चमकली. जिल्हास्तरावर पंचवीस, राज्यस्तरावर बारा पदके मिळवली आहेत. यामध्ये राज्यस्तरीय तीन सुवर्ण नऊ रौप्य पदकांची कमाई केली आहे. याही पलीकडे झेप घेण्याची तिची मनीषा आहे. हमालीतून मिळेल ते सारे राहुल तिच्यावर खर्च करतात. 
या बाप-लेकीच्या धडपडीची दखल जिल्हा परिषदेने घेऊन ‘बेटी बचाओ...बेटी पढाओ’ या अभियानासाठी तिची निवड केली आहे. राज्यातील निवडक बारा जणींमध्ये तिचा समावेश आहे.

कोल्हापुरातून ती एकटी आहे. तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, अधिकारी इंद्रजित देशमुख, महिला बालकल्याण अधिकारी सोमनाथ रसाळ, अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक, जिल्हा महिला समन्वयक आनंदा शिंदे यांनी यासाठी प्रयत्न केले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या माहितीपटासाठी प्रस्तावना दिली आहे. 

बापू हानीकारक है...
आपल्या मुलीला जन्माच्या बाराव्या दिवशी गावतळ्यात सोडून बारशाचा जलाभिषेक घातला. पुढेही खेळण्याच्या वयात ते तिला पोहायला शिकवत होते. अर्थात ‘सेहत के लिए बापू तू तो हानीकारक है..’  असंच म्हणण्याची भक्तीवर वेळ आली. मात्र स्वतः हमाली करून पोरीचं स्वप्न मोठं करणारा बाप तो बापच म्हणावा लागेल.

मी ‘वारस‘ म्हणून भक्तीकडे पाहात नाही तर ती ‘सरस’ आहे म्हणून पाहतो. ज्यांच्या पोटाला मुली आहे ते भाग्यवान. बाप समजून घेण्याचे सामर्थ्य मुलीत आहे. हमाली करून तिला घडविणारच.
- राहुल वाडकर,
राशिवडे.

Web Title: Bhakti Wadkar Special story