सांगतो एेक... "चॉकलेटवाल्या बाबां'ची कहाणी तुला... काय केलंय असं त्यांनी

Bhalerao couple donated to school
Bhalerao couple donated to school

राहुरी : त्यांचे वय वर्षे अवघे नव्वद. टपाल खात्यात होते. आता 30 वर्षे झालीत ते निवृत्त होऊन. दरमहा 937 रुपये पेन्शन बसते. पती-पत्नी दोघेच घरात असतात. आपल्याला किती वेदना आहेत, दुःख आहेत. याचा त्यांनी कधी विचारच केला नाही. गावात ते दिसले रे दिसले मुलांचा गराडा त्यांच्याभोवती पडतो. कारण ते खाऊ देतात. "चॉकलेट' वाटतात. त्यामुळे परिसरात "चॉकलेट आजोबा' म्हणूनच त्यांची ओळख आहे. 

आयुष्याची पुंजी केली दान

ते एवढ्यावरच थांबले नाहीत. आयुष्यभर जमविलेली दोन लाख रुपयांची पुंजी त्यांनी गावातील दोन विद्यालयांना दान केली. मुलांच्या भवितव्यासाठी ती कामी यावी, हाच त्यामागे उद्देश. मनोहर अनंत भालेराव (वय 90, रा. वांबोरी, ता. राहुरी), असे या दानशूर व्यक्तिमत्त्वाचे नाव. 

वांबोरी येथील महेश मुनोत विद्यालय व तनपुरे कन्या विद्यालयास त्यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश दिला. संस्थेचे अध्यक्ष, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्याकडे मनोहर भालेराव व त्यांच्या पत्नी विद्या भालेराव या दाम्पत्याने प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांच्या हस्ते भालेराव दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. प्रभारी मुख्याध्यापक बी. आर. साळुंके, सुनंदा हरी एडके, भागवत पागिरे, बाळासाहेब कुलकर्णी, बाबासाहेब गायकवाड, विजय करपे, संदीप निकम, भाऊसाहेब पटेकर आदी उपस्थित होते. 

तनपुरे वाड्यात ५४ वर्षांनी

"तनपुरे वाड्यात 1966 मध्ये आलो होतो. डॉ. दादासाहेब तनपुरे यांना भेटलो होतो. नंतर 54 वर्षांनी या निमित्ताने येणे झाले,' अशी आठवण भालेराव आजोबांनी सांगितली. 

ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक

ते ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यातून जमलेल्या दक्षिणेतून भालेराव यांनी बचत केली. आणि तीही समाजाला मुक्तहस्ते वाटून टाकली. समाजाचे आहे ना समाजाला दिलं पाहिजे, असे ते मानतात. 

...म्हणून ठेवतो "चॉकलेट' खिशात 
भालेराव म्हणाले, ""निवृत्तीनंतर ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला. लहान मुलांच्या जन्मपत्रिका करायला सुरवात केली. चरितार्थाचे साधन झाले. गरजा मर्यादित ठेवल्या. लहान मुलांचा लळा लागला. खिशात कायम "चॉकलेट' ठेवण्याची सवय लागली. गावातून फिरताना रडणाऱ्या लहान मुलांना "चॉकलेट' दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर पसरणारा आनंद पाहण्यात सुख वाटू लागले. मुलांच्या प्रेमापोटी, त्यांचे भवितव्य घडविणाऱ्या गावातील शाळांना, जमवलेली पुंजी देण्याचे ठरविले.''  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com