Video: आमदार भालके म्हणाले, मी शरद पवारांचा पट्टा...

अभय जोशी
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

विजयाची हॅट्ट्रिक केल्यानंतर कार्यकर्त्यांनी भालके यांना टेम्पोवर बसवून त्यांची वाजत गाजत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली.

पंढरपूर : कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट केलेल्या पैलवान भारत भालके यांनी राजकीय आखाड्यात सलग तीन वेळा तीन मातब्बरांना अस्मान दाखवले. कुस्तीत समोरच्या पैलवावानाला आव्हान देण्यासाठी दंड थोपटले जातात आणि कुस्ती जिंकल्यानंतर दोन्ही हातवर करून आनंद व्यक्त केला जातो. त्याच पद्धतीने काल भालके यांनी विजयी मिरवणुकीत दोन्ही हातवर केले आणि नंतर दंड थोपटून मी शरद पवारांचा पट्टा आहे, असे म्हणत विरोधकांना पुन्हा आव्हान दिले. त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी देखील वडिलांनी सलग तीन विजय मिळवल्याचा आनंद म्हणून तिथेच पहिलवानी पद्धतीने तीन बैठका मारून आनंद व्यक्त केला.

सरकोली तालुका पंढरपूर येथील शेतकरी कुटुंबातील भारत भालके यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. कुस्तीच्या आवडीमुळे कोल्हापूरला राहून त्यांनी तालमीत कुस्तीचे धडे गिरवले आणि अनेक पैलवानांना चितपट केले. भालके यांनी 2009 मध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील 2014 मध्ये प्रशांत परिचारक आणि काल ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक अशा तीन दिग्गज नेत्यांना विधानसभेच्या राजकीय आखाड्यात अस्मान दाखवले. 

विजयाची हॅट्ट्रिक केल्यानंतर कार्यकर्त्यांनी भालके यांना टेम्पोवर बसवून त्यांची वाजत गाजत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली. शिवाजी चौकात ही मिरवणूक येण्यापूर्वी भालके यांचे पुत्र भगीरथ यांनी जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. परिचारक घराण्यातील कोणीही मैदानात या चितपट करू असे आव्हान देत वडिलांनी सलग तीन वेळा मोठा विजय मिळवल्याचा आनंद व्यक्त करताना भगीरथ यांनी व्यासपीठावरच पैलवानी पद्धतीने तीन बैठका मारल्याने कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आले.

भारत भालके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी बोलताना भालके म्हणाले, दोन वर्षांपूर्वीच आपण काही कच्च्या गुरुचा चेला नाही असे सांगितले होते. मी शरद पवारांचा पट्टा आहे.

सुधाकरपंत परिचारक यांना हरवून कै. औदुंबर आण्णा पाटील, कै. यशवंतभाऊ पाटील आणि कै. वसंतराव काळे यांच्या पराभवाचा वचपा जनतेच्या आशीर्वादामुळे काढता आला असे त्यांनी नमूद केले आणि अखेरीस कुस्ती जिंकल्याप्रमाणे दोन्ही हातवर करून विजयी भावमुद्रेने दंड थोपटून पुन्हा विरोधकांना आव्हान दिले. पैलवान भालके यांचा हा आवेश आणि उत्साह पाहून उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharat Bhalake says I am Sharad Pawars Followers