...तर रद्दही होईल गॅस कनेक्‍शन

शैलेन्द्र पाटील
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

भारत गॅस कंपनीकडून ग्राहकांच्या घराघरांत सर्वेक्षण सुरू

सातारा - तुमच्या किचनमध्ये कोंदट वातावरण आहे..., रेग्युलेटर ओरिजनल किंवा सुस्थितीत नाही..., रबर ट्यूब आयएसआय मार्कची नाही..., त्याला टी कनेक्‍शन जोडलंय..., सिलिंडरपेक्षा कमी उंचीवर शेगडी ठेवताय... तर सावधान..! गॅस कंपनीचे लोक सर्वेक्षणासाठी कधीही तुमच्या किचनमध्ये शिरू शकतात. या पाचपैकी तीन प्रश्‍नांची उत्तरे होकारार्थी आल्यास तुम्ही धोकादायक स्थितीतील ग्राहक ठरू शकता. प्रसंगी तुमचे गॅस कनेक्‍शन सुद्धा बंद होऊ शकते..! 

हो, ही बातमी खरी आहे. ‘भारत गॅस’ या कंपनीने आपल्या ग्राहकांचे कनेक्‍शन तपासण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये कंपनीचे कर्मचारी आपल्या ग्राहकाच्या किचनमध्ये जाऊन सर्वेक्षण करणार आहेत.

मोबाईलवरील सॉफ्टवेअरमध्ये सर्वेक्षणाची माहिती भरली जाईल. त्याचबरोबर गॅस कनेक्‍शन व भोवतालचा एक फोटो काढला जाईल. ही सर्व माहिती कंपनीकडे ऑनलाईन जमा होईल. सुरक्षा ट्यूब आयएसआय प्रमाणित किंवा खराब असल्यास १९० रुपये घेऊन ती जागेवर बदलून देण्यात येईल. 

प्रत्येक प्रश्‍नाला १० गुण असतील. ८० किंवा त्यापेक्षा कमी गुण मिळालेल्या ग्राहकाला धोकादायक स्थितीतील ग्राहक समजण्यात येईल. कंपनीकडून त्या ग्राहकाचे प्रबोधन केले जाईल. स्वत:च्या कुटुंबाच्या सुरक्षेची पुरेशी काळजी न घेणाऱ्या ग्राहकाचे प्रसंगी कनेक्‍शन रद्द होऊ शकते. 

येथील बी. जी. भुरके अँड सन्सचे व्यवस्थापक पंकज टोणपे यांनी या संदर्भात बोलताना सांगितले, ‘‘सिलिंडरपेक्षा नेहमीच किमान दोन फूट उंच ठिकाणी शेगडी ठेवावी. 

गॅस गळतीचा धोका अधिक असल्याने पाईपला टी कनेक्‍शन जोडू नये. महत्त्वाचे म्हणजे गॅसची सुरक्षा ट्यूब ही आयएसआय मार्कचीच हवी. बऱ्याच वेळा ग्राहक पाण्याची पाइप वापरतात; जे सर्वाधिक धोकादायक आहे. यातून निर्माण होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी आम्ही साताऱ्यात सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. सातारा आणि परिसरात भारत गॅसचे सुमारे ६० हजार ग्राहक आहेत. या सर्वच ग्राहकांचे सर्वेक्षण होणार आहे. नागरिकांनी स्वत:च्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा उपायांचा अवलंब करावा.’’

‘‘घरगुती गॅसच्या आतापर्यंत झालेल्या अपघातांमध्ये सुमारे ९० टक्के अपघात हे या पाचपैकी एका कारणामुळे झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे कंपनीने ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम हाती घेतली आहे. सातारा जिल्ह्यात भारत गॅसचे साडेचार लाख ग्राहक आहेत. त्यांच्याकडे सर्वेक्षण सुरू झाले आहे.’’ 

- विशाल चव्हाण, भारत गॅसचे सहायक व्यवस्थापक, सातारा- सांगली जिल्हा

Web Title: bharat gas survey