चंदगडची पाटीलकी भाजपच्या गोटात ! 

चंदगडची पाटीलकी भाजपच्या गोटात ! 

चंदगड - चंदगड तालुक्‍याच्या राजकारणात चाळीस वर्षांहून अधिक काळ पाटलांचे वर्चस्व आहे. माजी आमदार नरसिंगराव पाटील, माजी राज्यमंत्री भरमू पाटील व दौलत कारखान्याचे ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील या तीन पाटलांभोवतीच येथील राजकीय सत्ताकारण फिरत राहिले. यापैकी गोपाळराव पाटील यांनी दोन वर्षापूर्वी भाजप प्रवेश केला. त्यापाठोपाठ माजी राज्यमंत्री भरमूअण्णाही याच पक्षात डेरेदाखल होत असल्यामुळे चंदगडची पाटीलकी भाजपच्या गोटात सामावणार आहे. 

नेता म्हणजे देव असा सुवर्णकाळ अनुभवलेल्या तिन्ही पाटलांनी तालुक्‍याच्या राजकारणावर वर्चस्व ठेवले. विधानसभा, दौलत कारखाना, तालुका संघ, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, गोकुळ दूध संघ या सर्व महत्त्वाच्या सत्तास्थानावर याच नेत्यांपैकी कोणाना कोणाचीतरी पकड आहे. भाषावार प्रांत रचनेनंतर निर्माण झालेल्या विधानसभा मतदारसंघात चंदगड आणि आजरा तालुक्‍याचा पाऊण भाग समाविष्ट झाला. चाळीस वर्षांत एकदाच आजरा तालुक्‍याला वसंतराव देसाईंच्या रुपाने आमदारपद मिळाले. त्यानंतर मात्र नेहमी हे पद चंदगड तालुक्‍याकडेच राहिले.

2009 ला मतदारसंघाची पुनर्रचना झाली. आजऱ्याचा काही भाग तुटला जाऊन गडहिंग्लज तालुक्‍याचा मोठा भाग जोडला गेला. या नव्या मतदारसंघावर मात्र कै. बाबासाहेब कुपेकर यांनी पक्कड घेतली. असे असले तरी चंदगड तालुक्‍याचे राजकारण व्यक्तीवादीच राहिले. पक्षापेक्षा गटाच्याच राजकारणाची चलती राहिली. नेता म्हणजे गट आणि नेता म्हणजेच पक्ष अशी अवस्था आजही आहे. नेता पक्ष बदलतो त्यावेळी त्याच्याबरोबर कार्यकर्त्यांचाही प्रवेश झालेला असतो. त्यासाठी वेगळा कार्यक्रम करण्याची गरज नसते. राज्याच्या राजकारणात अनेक बदल झाले तरी चंदगडचे राजकारण आजही गटातटातच आहे हे विशेष. कार्यकर्त्यांच्या या विश्‍वासाच्या जोरावर नेत्यांनी लहानमोठ्या सत्तास्थानावर पक्कड ठेवली आहे. तेच त्यांचे अस्तित्व आहे. 

दोन तलवारी... 
बदललेल्या मतदारसंघात विधानसभेची गणिते आणि गटाचे अस्तित्व डोळ्यासमोर ठेवून नेत्यांना निर्णय घ्यावे लागले. प्रथम गोपाळराव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला. योगायोगाने राज्यात आणि केंद्रात भाजपचे नाणे खणखणीत चालले. त्याचा लाभ त्यांच्या गटाला झाला. त्यांच्यापाठोपाठ आता भरमू पाटीलही भाजपच्या गोटात जात आहेत. युती शासनात त्यांनी रोजगार हमी योजना मंत्रिपद भुषवले होते. त्यावेळी मित्र पक्ष म्हणून भाजपचा अनुभव आहेच. आता ते थेट या पक्षात सामिल होत आहेत. तीन पैकी दोन पाटील या पक्षात दाखल झाल्यावर चंदगड मतदारसंघात पक्षाची ताकद वाढणार आहे. परंतु एका म्यानात दोन तलवारी राहणार का असाही प्रश्‍न आहे. त्याचे उत्तर मात्र येणारा काळच देईल.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com