भरमूअण्णा म्हणतात, चंदगड तालुक्‍याचा भावी आमदार हा भाजपचाच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

इच्छुक उमेदवारांच्या कार्याची पडताळणी करून विधानसभेसाठीच्या उमेदवाराची निश्‍चिती केली जाईल. चंदगड तालुक्‍यात भाजपची ताकद वाढली असून विकासाच्या दृष्टीने यापुढील काळातही तालुका अग्रेसर राहील.
- गोपाळराव पाटील, सदस्य, भाजप प्रदेश कार्यकारिणी

चंदगड - तालुक्‍याच्या राजकारणात अनेक वर्षे विरोधक राहिलेले माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील व भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले. निवडणूक कोणी लढवायची हे कार्यकर्ते ठरवतील; परंतु चंदगड तालुक्‍याचा भावी आमदार हा भाजपचाच असेल, असे वक्तव्य करून भरमूअण्णांनी कार्यकर्त्यांना प्रेरित केले. ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांकडून अर्ज मागवले असून त्या पार्श्‍वभूमीवर हलकर्णी (ता. चंदगड) येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात कार्यकर्त्यांची बैठक झाली. भरमूअण्णा यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर गोपाळराव पाटील व त्यांनी प्रथमच एकत्रित कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पक्षाच्या दृष्टीने मतप्रदर्शन केले. 

भरमूअण्णा म्हणाले, ‘‘गोपाळराव व आम्ही भाजपच्या माध्यमातून एका व्यासपीठावर आलो आहोत. तालुक्‍याच्या विकासासाठी एकजूट कायम राखून क्रांती घडवू या.’’ 

सभापती बबन देसाई, शांताराम पाटील, सुरेश हरेर, उत्तम पाटील, सचिन बल्लाळ, शामराव मुरकुटे, अशोक जाधव, संजय पाटील, माधुरी भोसले, सचिन बल्लाळ, सुरेश सातवणेकर, शहाबुद्दीन नाईकवाडी, शंकर भोगुलकर, उत्तम पाटील, जगन्नाथ हुलजी, सुधाकर पाटील यांनी उमेदवारांसदर्भात आपली मते व्यक्त केली. गोपाळराव पाटील यांनी तालुक्‍यात भाजप वाढवण्यासाठी मोठे कष्ट घेतल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. मल्लिकार्जुन मुगेरी यांनी स्वागत केले. संदीप नांदवडेकर यांनी सूत्रसंचालन केले. भावकू गुरव यांनी आभार मानले.

इच्छुक उमेदवारांच्या कार्याची पडताळणी करून विधानसभेसाठीच्या उमेदवाराची निश्‍चिती केली जाईल. चंदगड तालुक्‍यात भाजपची ताकद वाढली असून विकासाच्या दृष्टीने यापुढील काळातही तालुका अग्रेसर राहील.
- गोपाळराव पाटील,
सदस्य, भाजप प्रदेश कार्यकारिणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharmuanna Patil comment Chandgad Taluka Next MLA from BJP