भावशाचा चकवा हे पोलिसांसमोर आव्हान

भावशाचा चकवा हे पोलिसांसमोर आव्हान

डबल मर्डरने खाकीवर प्रश्‍नचिन्ह - मिणच्याचा खून चक्रावणारा; घरफोड्या, चेन स्नॅचिंग अशा अनेक घटना
सांगली - पोलिसांच्या ताब्यातून पळाल्यानंतर सहा वर्षे चकवा दिल्यानंतर पुन्हा गावात येऊन निर्घृण खून करणाऱ्या भावशा पाटलाने वर्षअखेरीस पोलिसांची झोपच उडवली. सांगलीतून गुंड मिणच्या गवळीचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावणारी गुन्हेगारांची ‘मोडस’ चक्रावून सोडणारी ठरली. प्रत्येक महिन्यात खुनाचा प्रकार घडला. खुनी हल्ले, बंद घरफोड्या, मोटारीतून रोकड लंपास, चेन स्नॅचिंगसारख्या घटनांनी पोलिसांची डोकेदुखी यंदाच्या वर्षात वाढली. मसुचीवाडीतील छेडछाड प्रकरण, मिरजेतील विवाहिता आत्महत्याप्रकरणाची राज्य महिला आयोगाला दखल घ्यायला लागली.

खुनांची मालिकाच
कुडनूर (ता. जत) येथे माथेफिरूने आई, पत्नी आणि दोन मुलींचा खून केल्याची घटना सर्वाधिक डोके सुन्न करणारी ठरली. सिद्धनाथ येथे खून का बदला खून असा प्रकार घडला. सांगलीत गुंड मिणच्या गवळी याचा आर्थिक वादातून खून करून मृतदेह जाळून राख नदीत टाकल्याचा प्रकार घडला. मिणच्या हा खतरनाक गुंड होता. परंतू खून करून पुरावा नष्ट करण्याची ‘मोडस’ चक्रावून टाकणारी ठरली. गुंड रवींद्र कांबळेचा गोकुळनगरमध्ये खून झाला. सांगलीतील रामनगरमधील ‘डबल मर्डर’ तणाव निर्माण करणारा ठरला. बाज (ता.जत) येथे मुलाकडून आईचा खून. नांद्रेत मुलाकडून वडिलांचा खून. रेल्वेत बापाने चिमुरड्याला आपटले. तासगावला सुनेकडून सासऱ्याचा खून. जाडरबोबलाद (ता.जत) येथे तरुणाकडून मावशीचा खून.

तडसरमध्ये मुलासमोर पत्नीचा खून. पलूसला दारूड्याकडून आईचा खून. करांडेवाडी (ता. कडेगाव) येथे सरपंचाचा भावाकडून खून या घटना नात्यातील संघर्ष आणि अन्य कारणातून घडल्या. त्याशिवाय कुपवाड, धामणी, रेठरेहरणाक्ष, सलगरे, येवलेवाडी, येलूर, पलूस, बिसूर, भिलवडी, बुधगाव, ढालगाव, आरग, मिरज, बंडगरवाडी, रावळगुंडवाडी, भांबर्डे, भोसे, घानवड, कामेरी, मुचंडी, गुलगुंजनाळ, गौरगाव, येळवी, लांडगेवाडी, तडसर आदी ठिकाणी खुनाचे प्रकार घडले. सलगरे येथील अनोळखी युगुलाचा खून उघडकीस आला नाही. मुचंडीच्या जंगलातील महिलेचा खून तपासावरच राहिला. हल्ल्याचे प्रकारही सांगली, कुपवाड, संजयनगरसह ग्रामीण भागात घडले.

वर्षात पाच टोळ्यांना मोका
तत्कालीन अधीक्षक सुनील फुलारी यांच्या काळात संजयनगर येथील खूनप्रकरणी गुंड म्हमद्या नदाफ टोळीतील २० जणांना मोका लावला. तर अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर गुंड दुर्गेश पवार टोळी, मध्या वाघमोडे टोळीसह चार टोळ्यातील २७ जणांना ‘मोका’ लावला. दोन गुंडांवर झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली. अवघ्या पाच महिन्यांत अशी कामगिरी जिल्हा पोलिस दलात ऐतिहासिक ठरली.

एलसीबी जोमात
इस्लामपूर यात्रेतील खून आणि एटीएममधील रक्षकाचा खून एलसीबीने उघडकीस आणला. सांगलीतील टोळीकडून दहा पिस्तुले व एक रिव्हॉल्व्हर जप्त केले. मिरजेत साडेतीन कोटीची रोकड जप्त केली. मध्यप्रदेशातील तरुणाकडून पिस्तूल जप्त केले. बिबट्याचे कातडे, गुटखा तस्करी, टॅंकरमधील रसायन चोरणारी टोळी जेरबंद केली. कोल्हापुरातील एसटी गॅंगमधील संजय किरणगीला अटक केली. कर्नाटकातील खुनाचा गुन्हा सांगलीतून उघडकीस आणला. अनेक फरारी आरोपींना पकडण्याची कामगिरी करत प्रलंबित गुन्हे उघडकीस आणले. भावशा पाटीलच्या तीन फरारी साथीदारांना आणि मध्या वाघमोडेला साथीदारासह जेरबंद केले.

गुंडाविरोधी पथकही चमकले
२५ लाख रुपयांचे हस्तिदंत जप्त केले. नरक्‍या वनस्पती तस्करांना अटक केली. दुचाकी चोरट्यांना अटक केली. दुचाकी चोराकडून महिलेचा खून उघडकीस आणला. ६ जेसीबी मशीन चोरणारी टोळी जेरबंद केली. जयसिंगपूर येथील चिकण्या ऊर्फ धनराज धुतरगी याचा मिरज ग्रामीण हद्दीत झालेला खून उघडकीस आणून आरोपींना अटक केली. या महत्वाच्या कामगिरीसह इतर गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी केली.

घरफोड्या, चेनस्नॅचरचे आव्हान
मावळत्या वर्षात बंद घरे, बंगले फोडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले. सांगलीत मोठ्या प्रमाणात बंद घरे फोडली गेली. 

परंतु त्या मानाने पोलिसांची कामगिरी अगदी सुमारच राहिली. चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हानच उभे केले आहे. बॅग लिफ्टिंग आणि मोटारीतून रोकड लंपास करण्याचे प्रकार घडले. हे गुन्हे अद्यापही तपासावरच आहेत. चेन स्नॅचिंगचे प्रकारही घडले. ‘धूमस्टाईल’ चोरट्यांनी अद्याप त्यांचे आव्हान जिवंत ठेवल्याचे चित्र आजपर्यंत कायम आहे.

मिरज, मसुचीवाडीप्रकरण चर्चेत
मिरजेत बलात्कारात पीडित महिलेवरच खंडणीचा गुन्हा दाखल केल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे प्रकार वर्षाच्या मध्यंतरीस घडला. त्यामुळे याप्रकरणात संबंधित पोलिसांची नाचक्कीच झाली. राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली. याप्रकरणात महिला पोलिस निरीक्षकासह कर्मचाऱ्यास निलंबित व्हावे लागले. मसुचीवाडी येथे छेडछाडीमुळे ग्रामस्थांचा शाळेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही आयोगाला दखल घ्यायला लावणारा ठरला.

निर्भया, दामिनी पथक
विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून निर्भया पथकाची स्थापना जिल्ह्यात झाली. हैदराबादच्या धर्तीवर छेडछाड रोखण्यासाठी तीन महिन्यांपासून साध्या वेशातील पोलिसांचे हे पथक प्रत्येक पोलिस ठाणे हद्दीत कार्यरत आहे. त्याशिवाय दामिनी गस्ती पथकही कार्यरत आहे. त्याशिवाय पोलिसांचे प्रतिसाद ॲपही मदतीसाठी कार्यरत करण्यात आले.
 

इतर ठळक घटना
भोसे व डफळापूर येथे दरोडेखोरांचा धुमाकूळ
तासगाव पोलिसांकडून पाचगाव येथील खून उघडकीस
सांगलीत ‘गेम’ च्या तयारीतील टोळी जेरबंद
उमदी पोलिस ठाण्यात संशयिताची आत्महत्या
उमदी आत्महत्येप्रकरणी  तिघां पोलिसांवर गुन्हा
कुंडल आणि इतरत्र बाललैंगिक अत्याचार घटनामुळे संताप.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com