प्रज्ञाशोध परीक्षेचा भुदरगड पॅटर्न

युवराज पाटील
मंगळवार, 3 जानेवारी 2017

एकविसाव्या शतकातील चलनी नाणं म्हणून स्पर्धा परीक्षेकडे पाहिले जाते. स्पर्धेत विद्यार्थी टिकायचा असेल तर विचारशक्ती वाढवणे ही काळाजी गरज होती. नेमकी हीच गरज ओळखून भुदरगड प्रज्ञाशोध परीक्षेची संकल्पना पुढे आली. महाराष्ट्रात कोठेही पहिलीच्या वर्गासाठी अशी परीक्षा होत नाही. तिची मुहूर्तमेढ कोल्हापुरात रोवली गेली. दहावी-बारावीनंतरच स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यापेक्षा तिचे बाळकडू पहिलीच्या वर्गापासूनच मिळू लागले.

एकविसाव्या शतकातील चलनी नाणं म्हणून स्पर्धा परीक्षेकडे पाहिले जाते. स्पर्धेत विद्यार्थी टिकायचा असेल तर विचारशक्ती वाढवणे ही काळाजी गरज होती. नेमकी हीच गरज ओळखून भुदरगड प्रज्ञाशोध परीक्षेची संकल्पना पुढे आली. महाराष्ट्रात कोठेही पहिलीच्या वर्गासाठी अशी परीक्षा होत नाही. तिची मुहूर्तमेढ कोल्हापुरात रोवली गेली. दहावी-बारावीनंतरच स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यापेक्षा तिचे बाळकडू पहिलीच्या वर्गापासूनच मिळू लागले.

ही परीक्षा ऐच्छिक आहे, त्यामुळे कुठल्याही शासकीय नियमांची त्याला बाधा आली नाही. निवृत्त सहायक शिक्षण संचालक संपत गायकवाड यांनी तालुका स्तरावरून परीक्षेला सुरवात केली. नंतर तिचे रूपांतर शालेय चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निमित्ताने झाले. राज्यभर हा पॅटर्न राबविला गेला. तालुक्‍यातील सर्व माध्यमे व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी मोफत परीक्षा प्रकिया राबविली गेली. सराव परीक्षा केंद्र स्तरावर घेतली जाते. परीक्षेत पहिलीच्या अभ्यासक्रमावर आधारित वीस प्रश्‍न भाषा विषयाचे, वीस प्रश्‍न गणिताचे, दहा प्रश्‍न इंग्रजीचे असतात. चार पर्यायांमधून उत्तर शोधून चौकटीत अचूक उत्तर लिहणे अपेक्षित आहे. अंतिम परीक्षा तालुकास्तरावर सर्व विद्यार्थ्यांची होते. कालावधी केवळ तासाचा असतो. सर्व शाळांसाठी ‘भुदरगड प्रज्ञाशोध’ ही पुस्तिका मोफत दिली जाते. अंतिम परीक्षेतील गुणांची खात्री करण्यासाठी पालकांच्या मागणीनुसार पेपरचे फेरमूल्यांकन केले जाते. परीक्षेचा अभ्यासक्रम, पुस्तके, स्वाध्याय पुस्तिका, स्वयंअध्ययन, अंगणवाडीसाठी असलेल्या शासनाच्या पुस्तकांचा आधार घेतला जातो. खर्च शिक्षण विभाग, सेवाभावी संस्था, विविध संघटना, दानशूर व्यक्तींकडून केला जातो. रंगीत आकर्षक प्रश्‍नपत्रिका, ज्ञानरचनावादानुसार चित्रांचा वापर केला जातो. 

जिल्हा परिषद शाळांतील पहिलीच्या मुलांसाठी ही पहिलीच स्पर्धा परीक्षा ठरली. त्यातून वाचन आणि लेखन, अंकज्ञान, अंकावरील क्रिया आदी क्षमता विकसित झाल्या. इंग्रजी विषयाची पायाभूत तयारी पहिलीपासूनच होऊ लागली. परीक्षेत भाषा, गणित, परिसर अभ्यास व इंग्रजी विषयाचा समावेश, स्पर्धा परीक्षेचे स्वरूप परीक्षेचे असल्याने विद्यार्थ्यांना चार पर्यायांतून अचूक उत्तर शोधून चौकोनात पर्याय लिहिण्याची सवय अंगवळणी पडू लागली. तासात पन्नास प्रश्‍न सोडवायचे असल्याने वेग, अचूकता वाढीस लागली. भविष्यात द्याव्या लागणाऱ्या स्पर्धा परीक्षेची काही प्रमाणात तयारी प्रज्ञाशोध परीक्षेने केली. कोणतेही शुल्क नाही व विद्यार्थ्यांच्या जाणिवा निर्माण करणारी परीक्षा म्हणून प्रज्ञाशोध परीक्षेकडे पाहिले जाते. यूपीएससी, एमपीएससी, शालेय जीवनातील एन.टी.एस., एम.टी.एस. यांसह पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची पहिली पायरी म्हणून परीक्षेकडे पाहिले जाते.

Web Title: bhdargad pattern