आम्ही बक्षीस देतो; पण शोध लावाच!

लुमाकांत नलवडे
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

शाहूवाडी तालुक्‍यात आठवड्यात दोन आणि सहा महिन्यांत तीन कोवळ्या मुलींचा जीव घेण्यात आला. त्यातील भेडसगावची घटना दोन दिवसांपूर्वी घडलेली. त्या कोवळ्या जीवांना ‘नकुशी’ ठरविण्यात आले. गावात या प्रकारावरून तीव्र संताप व्यक्त होत आहे. येथे भेट देऊन झाला प्रकार जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

कोल्हापूर - साहेब, आम्ही बक्षीस देतो; पण अंगाई तलावात कोणी अर्भक टाकले याचा शोध लावाच,’ अशा शब्दांत गावकरी भावना व्यक्त करीत आहेत. ज्या अंगाई तलावावर मराठी चित्रपट निघाला, त्याच तलावामध्ये स्त्री जातीचे मृत अर्भक मिळाल्याने गावकरी संतापले आहेत. गावकऱ्यांसाठी तलाव दैवत आहे. तेथेच असे घृणास्पद कृत्य गावातील कोणीही करणार नाही, असाही ठाम विश्‍वास ग्रामस्थांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. शाहूवाडी तालुक्‍यात आठवड्यात दोन आणि सहा महिन्यांत तीन मुलींचा जीव घेण्यात आला. येथे कळ्या का खुडल्या जात आहेत, याची माहिती घेण्यासाठी आम्ही पोचलो.

सकाळी आठ वाजता भेडसगावकडे निघालो. गावात जातानाच सरपंच अमरसिंह पाटील  भेटले. ‘भेडसगावातील कोणी तलावात अर्भक टाकलेले नसणार, आमच्यासाठी तलाव दैवत आहे. कोणी टाकले, हे दोन दिवसांत तपासात पुढे आले नाही; तर मात्र आम्ही आंदोलन करू,’ असे त्यांनी सांगितले. तेथून पुढे आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्राकडे गेलो. नूतनीकरण सुरू असलेल्या केंद्रात डॉ. एन. एस. माळी यांच्यासमोर महिला रुग्णांची रांग होती. जुन्या इमारतीत डॉ. जी. के. पाडवी ‘आशा वर्कर’ महिलांची बैठक घेत होते. याचवेळी तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक महादेव जठार तेथे होते. डॉ. माळी यांना भेटलो. ते म्हणाले, ‘‘अंगाई तलावात मिळालेले अर्भक पूर्ण वाढ झालेले होते. नाळ त्यालाच होती.’’ त्याचवेळी हारुगडेवाडीतील रमेश चव्हाण (भाजपचा कार्यकर्ता) भेटला. ‘साहेब, आम्ही बक्षीस देतो; पण ज्यांनी अर्भक टाकले आहे, त्यांना पकडा असेच आम्ही आता पोलिसांना सांगणार आहोत,’ असे म्हणत त्याने फोनाफोनी सुरू केली. गावातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकही तेथे होते. त्यांनीही त्याच्या सुरात सूर मिसळला. पाच-दहा हजार आमचे जाऊ देत; पण कोणी टाकलं, त्याला पकडायला पाहिजे, असे तेही सांगू लागले. पुढे आशा वर्कर बैठकीत गेलो. तपास अधिकारी जठार यांनी प्रत्येक आशा वर्करचे नाव घेऊन त्यांच्याकडून बाळंत आणि गर्भवतींची नावे, माहिती घेतली. परंतु, असे काम आपल्या गावात कोण करणार नाही, असे त्यांनीही सांगितले. जठार यांनी, काही सुगावा लागला तरीही सांगा, असे आवाहन केले.

तालुक्‍यातील सावर्डी गावात आई-वडिलांनीच दोन महिन्यांच्या चिमुकलीला दुधातून थिमेट (विषारी द्रव) घालून मारलेल्या घटनेची चर्चा डॉक्‍टर आणि पोलिसांशी बोलताना सुरू झाली. दोन महिन्यांनी आलेल्या फॉरेन्सिक अहवालावरून आई-वडिलांना अटक केली आहे. पोलिस कोठडीतील चौकशीतही ते ‘आम्ही नाही मारले’ एवढंच सांगत आहेत; पण पुराव्यावरून त्यांनीच मारले असल्याचे आमचे ठाम मत आहे, असे स्पष्ट करीत जठार म्हणाले, ‘‘ते संपत नाही; तोपर्यंत हा विषय पुढे आला आहे. विषय गंभीर असल्यामुळे तीन दिवस गावातच तळ ठोकून आहे. आजूबाजूच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातही रेकॉर्ड तपासायचे काम सुरू आहे. परंतु, गावातील तलावात का आणून टाकले, हे कळत नाही. नाळ अर्भकाभोवतीच असल्यामुळे हे बाळंतपण घरातच झाल्याचा आम्हाला संशय आहे. डॉक्‍टरांकडे बाळंतीण झाली असती तर नाळ कापली असती. आता गावागावातील माहिती जमा केली आहे. ऊस कापायला आलेल्या टोळ्यांतील कोणी हे कृत्य केले काय, त्याचाही तपास करीत आहे. तलावाजवळील सीसीटीव्हीचे फुटेज घेतले आहे. लवकरच माहिती पुढे येईल. डॉक्‍टरांनी शवविच्छेदनाच्या अहवालात व्हिसेरा राखून ठेवला आहे. त्यामुळे अधिक तपासावर मर्यादा आहेत.’’ असे सांगून ते पुढे फोनवर बोलू लागले आणि आम्ही तलावाकडे निघालो.

दुष्काळात या गावाला तलावाने सावरले. तलावात पाणी आले, याचीही अख्यायिका आहे. त्यावर आजही लोकांचा विश्‍वास आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ भावनिक झाल्याचे दिसून आले. घटनास्थळी आम्ही पोलिसपाटील प्रदीप तांबे यांच्याशी बोलत राहिलो. त्यांनी घटनास्थळी अर्भक कसे पडले होते, ते वाहत तलावात कसे जात होते, याची माहिती दिली. याचवेळी काही वेळात तेथे पोलिस कॉन्स्टेबल पी. एस. बांबरे आले. गावकरीही जमले. ‘हे काम आपल्या गावातील कोणाचे नाही’ असे प्रत्येक जण विश्‍वासाने सांगत होता. अर्भक कोणी टाकले त्याला पकडायलाच पाहिजे. माहिती देणाऱ्याला बक्षीस देऊया, असेही ते सांगत होते. 

तेथून पुढे आम्ही शवविच्छेदन केलेल्या डॉक्‍टरांना भेटण्यासाठी मलकापुरातील आरोग्य केंद्रात पोचलो. तेथील डॉ. नंदकुमार पाटील नुकतेच तेथून निघून गेले होते. त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले, की अर्भकाच्या बरगड्या पुण्याला, तर पोटासह इतर काही भाग कोल्हापुरातील फॉरेन्सिक लॅबला पाठविला आहे. त्यांच्या अहवालानंतर कारण आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी पुढे येतील.

 

Web Title: Bhedsgaon Infant Case Follow up