‘नेम’ साधायचाय, पण...

रविकांत बेलोशे
मंगळवार, 27 मार्च 2018

भिलार - महाराष्ट्र रायफल असोसिएशनने घेतलेल्या राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेतून राजपुरी (ता. महाबळेश्वर) गावची कन्या व सातारा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी ज्योती बाजीराव राजपुरे हिची प्री- नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली. मात्र, ज्योतीच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. कुटुंबीयांना स्पर्धेसाठीचा खर्च परवडणारा नसल्याने जिल्ह्यातील क्रीडा संघटना व क्रीडाप्रेमींनी तिच्या वाटचालीस हातभार लावावा, अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

राजपुरी (ता. महाबळेश्वर) येथील ज्योती ही शेतकरी कुटुंबातील बाजीराव राजपुरे यांची कन्या. तुटपुंज्या शेतीतून भागत नसल्याने कुटुंबाचा भार सांभाळण्यासाठी राजपुरे हे पाचगणीत शाळेत काम करतात. लहानपणापासूनच ज्योतीला रायफल शूटिंगचे आकर्षण होते. मुलीच्या आवडीच्या आड कधीही यायचं नाही, यासाठी त्यांनी रायफल खरेदी करून तिचा सराव सुरू केला. मराठी शाळेत शिक्षण घेताना तसेच सातारा येथे एकलव्य ॲकॅडमीत दर रविवारी सरावाला ती जात होती. एम. आर. भिलारे हायस्कूलमधून २०१५ मध्ये अमरावती येथे राज्य पातळीवर खेळताना ज्योतीने यश मिळवले. याच वर्षी विभागीय पातळीवर स्पर्धेतही ज्योती चमकली.

मुंबईत नुकत्याच झालेल्या स्पर्धेत ४०० पैकी ३७०.९ डेसिबल स्कोअर मिळवून ज्योतीने राष्ट्रीय संघात स्थान पटकावले. या यशाचा आनंद असतानाच पुढील खर्च आपणाला परवडणार का? हा प्रश्न ज्योतीच्या वडिलांना पडला आहे. काहीही झाले तरी मुलीला स्पर्धेला पाठवयाचेच, या हेतूने झपाटलेल्या श्री. राजपुरे यांनी घरातील सोने गहाण ठेवून ज्योतीसाठी सव्वा लाखाची रायफल खरेदी केली आहे. पण, आता स्पर्धेसाठी जाण्यासाठीच्या आर्थिक खर्चाची चिंता त्यांना लागून राहिली आहे. आर्थिक खर्च परवडत नसला, तरी जिद्दीने ज्योतीचे प्रशिक्षण सुरू ठेवले आहे. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्योतीही सज्ज असून, तिच्या जिद्दीला आर्थिक मदतीचा हात हवाय.

ज्योतीच्या राष्ट्रीय संघातील प्रवेशाने आशा निर्माण झाल्या आहेत. महाबळेश्वर तालुक्‍याच्या डोंगराळ भागातील गरीब कुटुंबातील कन्या राज्याच्या संघात गेल्याने तिचे सातारा पालिकेचे नगरसेवक जयेंद्र चव्हाण, महाबळेश्वरच्या सभापती रूपाली राजपुरे, जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, प्रवीण साळुंखे, रविराज सोनवणे, जितेंद्र परदेशी आदींनी अभिनंदन केले.

Web Title: bhilar news satara news raifal shooting competition