भिलार साहित्यिकांचे "डेस्टिनेशन' बनेल - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

भिलार (महाबळेश्‍वर) - मराठी माणूस हा ज्ञानपिपासू असल्याने माध्यमांत कितीही बदल झाले, कितीही डिजिटलायझेशन झाले, तरी वाचन व मराठी भाषेचे महत्त्व कधीही कमी होणार नाही. "पुस्तकाचे गाव' म्हणून इतिहासात नोंद झालेले भिलार गाव साहित्यिक व प्रकाशकांचे डेस्टिनेशन म्हणून उदयाला येईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केली. 

भिलार (महाबळेश्‍वर) - मराठी माणूस हा ज्ञानपिपासू असल्याने माध्यमांत कितीही बदल झाले, कितीही डिजिटलायझेशन झाले, तरी वाचन व मराठी भाषेचे महत्त्व कधीही कमी होणार नाही. "पुस्तकाचे गाव' म्हणून इतिहासात नोंद झालेले भिलार गाव साहित्यिक व प्रकाशकांचे डेस्टिनेशन म्हणून उदयाला येईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केली. 

भिलार या भारतातील पहिल्या पुस्तकांच्या गावाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पशुसंवर्धन व मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, आमदार मकरंद पाटील, महाबळेश्‍वरच्या सभापती रूपाली राजपुरे, भिलारच्या सरपंच वंदना भिलारे, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, अतुल भोसले, भूषण गगराणी आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, ""आपल्या पूर्वजांनी गणित, भूगोल, खगोल, विज्ञान, ज्योतिषशास्त्र या क्षेत्रात संशोधनात्मक काम केले; पंरतु त्याच्या डॉक्‍युमेंटेशनमध्ये आपण मागे राहिलो. त्या काळात आपण डॉक्‍युमेंटेशन केले नाही; पंरतु इतर देशांनी मात्र आपल्या संशोधनाचे डॉक्‍युमेंटेशन केले आणि जगापुढे मांडून श्रेय घेतले. गेल्या काही वर्षांत छपाई यंत्रांच्या कालखंडानंतर या क्षेत्रात मोठी क्रांती झाली. वेगवेळ्या राज्यक्रांतीमध्ये लेखक आणि पुस्तके यांचे योगदान मोठे आहे. स्वातंत्यपूर्व काळात पुस्तके आणि वर्तमानपत्रे यांनी लोकांमध्ये स्फुल्लिंगे पेटवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पुस्तके आणि वर्तमानपत्रे शब्दांतून आग ओकत होती. त्यांच्यामुळे मोठी क्रांती झाली आणि देश स्वातंत्र्यासाठी मदत झाली. ही संस्कृती आपण जपून ठेवली, तर ती पुढील पिढीला देऊ शकतो.'' 

ते म्हणाले, ""आधुनिक युगात ब्लॉग लिहिण्याची संकल्पना रुजली आहे. ब्लॉगर मर्यादित शब्दांत आपली अभिव्यक्ती करतो; पंरतु पुस्तके व वर्तमानपत्रांमध्ये मर्यादा येत नसल्याने ते आपण अनेकांपर्यत पोचवू शकतो. पुस्तक वाचण्याचा निखळ आनंद कुठेच नाही. वाचनासाठी शांतता आवश्‍यक आहे. तो आनंद निसर्गाच्या सान्निध्यात मिळवून देण्यासाठी आम्ही भिलारची निवड केली. येथील लोकांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. याठिकाणी येणारा पर्यटक शांतपणे वाचनाचा आनंद घेईल आणि पुस्तकांच्या गावी आलोच आहे, तर महाबळेश्‍वरला जाऊ असाही विचार करेल. स्ट्रॉबेरीचे गाव म्हणून ओळख असलेले गाव आता पुस्तकांचे गाव म्हणून देशाच्या सर्व भाषिक राज्यांमध्ये पोचले आहे.'' 

श्री. तावडे म्हणाले, ""काही वर्षांपूर्वी कुटुंबासमवेत इंग्लंडमध्ये गेलो होतो. तेथील "हे ऑन वे' या पुस्तकांचे गाव पाहिले. त्यातून ही संकल्पना पुढे आली. ते गाव पुस्तक विक्रेत्यांचे आहे. 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्रात पुस्तकाचे गाव उभारण्याचा संकल्प सोडला. तो आज पूर्ण होतोय. विकासाचा बॅकलॉग, विभाग, गटतट यात न अडकता स्वाभाविक पर्यटक असलेले गाव म्हणून आम्ही भिलारची निवड केली आहे. भिलारमधील ग्रामस्थांनीही याला प्रतिसाद दिला. पहिल्या टप्प्यात आम्ही 15,000 पुस्तके भिलारला दिली असून, भविष्यात ही संख्या अडीच लाखांपर्यंत नेणार आहे. पर्यटनाच्या हंगामात भिलारमध्ये साहित्य महोत्सव भरवला जाणार आहे. बुक कॅपिटल हा युनोस्कोमार्फत दिला जाणारा किताब भिलारला मिळवून देण्याचा निश्‍चय आम्ही केला आहे.'' 

सर्व घरांसमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सर्वांचे जंगी स्वागत करण्यात आले. हिलरेंज हायस्कूलचे विद्यार्थी व ग्रामस्थांनी काढलेल्या ग्रंथदिंडीचा प्रारंभ श्री. तावडे यांच्या हस्ते करण्यात आला. 

भाषणापेक्षा वाचन जास्त हवे 

राजकीय कार्यक्रमात भाषणांच्या रेलचेलीत कार्यक्रम रटाळ होत जातो. या परंपरेला फाटा देत संयोजकांनी केवळ मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांचीच भाषणे घेतली. भाषणापेक्षा वाचन जास्त झाले पाहिजे, अशी शिकवण शिक्षणमंत्र्यांनी आपल्या भाषणातून दिली. बाळासाहेब भिलारे यांनी स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र उभारण्याच्या मागणीसह येथील काही प्रश्‍न आपल्या भाषणातून मांडले. मात्र, या सर्व प्रश्‍नांना बगल देत मुख्यमंत्र्यांनी फक्त पुस्तकांच्या गावाविषयीच मुद्दे मांडून आपले भाषण आवरते घेतले.

Web Title: Bhilar will become the "Destination" of the literary