भिलवडीतील खूनप्रकरणी संशयितास पोलिस कोठडी

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

भिलवडी : माळवाडी (ता. पलूस) येथील शाळकरी मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपी प्रशांत ऊर्फ सोन्या ऊर्फ हिमेश राजेंद्र सोंगटे (वय 26, माळवाडी) याला नऊ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश आज देण्यात आला. सांगलीतील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांच्यासमोर पोलिस बंदोबस्तात त्याला हजर करण्यात आले. दरम्यान, खूनप्रकरणात सोंगटेबरोबर अन्य साथीदार असावेत, अशी शक्‍यता तपासाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे.

6 जानेवारी रोजी 14 वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याचा प्रकार माळवाडी (भिलवडी) येथे उघडकीस आला. तब्बल नऊ दिवस 150 पोलिसांनी तपास करून खुनाचा छडा लावला. प्रशांत सोंगटेने 5 जानेवारीला रात्री मुलीचा ती घरातून बाहेर पडल्यानंतर पाठलाग केला. नंतर एका शेतात बलात्कार करून तोंड दाबून तिचा खून केला, असे तपासात स्पष्ट झाले.

प्रशांतला अटक केल्यानंतर आज बंदोबस्तात सांगलीतील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सापटणेकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला. संशयित सोंगटेने बलात्कार कोठे केला? खून कोठे व कसा केला? तसेच आणखी साथीदारांचा सहभाग आहे काय? आदी गोष्टींचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायाधीश सापटणेकर यांनी 23 जानेवारीपर्यंत सोंगटे याला पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, पोलिसांनी सुरवातीला एकापेक्षा अधिक आरोपी याप्रकरणात सहभागी असल्याचे सांगितले होते. त्यादृष्टीने सोंगटेचा साथीदार कोण, याचीही चौकशी सुरू केली आहे. सोंगटेची कसून चौकशी सुरू असून, परिसरातही शोध घेतला जात आहे.

Web Title: bhilwadi suspect get police custody